निपाणी : विठू नामाच्या गजरात निपाणी शहर व परिसरात देवशयनी आषाढी एकादशी प्रतिवर्षीप्रमाणे सर्वत्र भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी दिवसभर आबालवृद्ध भाविकांची रीघ लागली होती.
आषाढी एकादशीनिमित्त बागवान गल्ली, येथील विठ्ठल मंदिरामध्ये धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. शहरातील दत्त मंदिर, मंगळवार पेठेतील महादेव मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
शहर व ग्रामीण भागात लहान-मोठ्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल-रुक्मिणी आणि वारकर्यांच्या वेशभूषेतील बालचमूंनी सर्वांचे लक्ष वेधले. तुळस, वीणा, टाळ-मृदंग, भगवी पताका घेऊन सहभागी वारकर्यांनी विठ्ठलासह राम कृष्ण हरिचा जयघोष केला. पहाटे काकडा आरती झाल्यावर निपाणी येथील मंदिरात श्रीमंत दादाराजे निपाणीकर, साहिल शाह, दीपक राऊत, अभिनंदन मूदकुडे यांच्या हस्ते विठ्ठल-रक्मिणी मूर्तीला अभिषेक करण्यात आला. पूजा व महाआरती झाल्यावर पालखी मिरवणूक व दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. विठ्ठल मंदिर, चिमगावकर गल्ली, हनुमान मंदिर, महालक्ष्मी मंदिर बागवान गल्ली मार्गे ही नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.
दिंडीमध्ये नगरसेविका अरुणा मुदकुडे यांनी तुळशी वृंदावन घेऊन सहभाग घेतला. सकाळपासूनच या मंदिरात दर्शनासाठी शहर व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर विविध भजनी मंडळाची भजन सेवा, हरिपाठ व रात्री हरी जागर करण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी भाविकांना शाबू खिचडी, केळी व राजगिर्याच्या लाडूचे वाटप करण्यात आले. विठोबा देव फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब तिप्पे, उपाध्यक्ष अभिनंदन भोसले, महालिंग कोठीवाले, रामचंद्र पोतदार, विठ्ठल जाधव, संजय कमते, राजू ठाणेकर, किरण रेपे, दत्ता कमते, एम. बी. पाटील, श्रेणिक कमते, आकाश सुतार, महादेव भुई, बसवराज पाटील, प्रथमेश मलाबादे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.