बेळगाव : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना मासिक रेशन वितरित केले जाते. अन्नभाग्य योजनेंतर्गत माणसी 10 किलो धान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून रेशन वितरणास विलंब होऊ लागला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. जुलै महिना निम्मा संपला तरी अद्याप लाभार्थ्यांना रेशन वाटप झाले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी वाढू लागल्या आहेत.
काँग्रेस सरकारने पंचहमी योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक असलेल्या अन्नभाग्य योजनेंतर्गत माणसी 10 किलो धान्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान जुलै महिन्यापासून माणसी 10 किलो तांदळाऐवजी 7 किलो तांदूळ आणि 3 किलो ज्वारी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जुलै महिन्यातील ज्वारी वाटपासाठी रेशन वितरणास विलंब झाला आहे, असे अन्न व नागरी पुरवठा खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून दरमहा रेशन वितरणास उशीर होत आहे.
दर महिन्याच्या 10 तारेखपर्यंत रेशन वितरण होणे, आवश्यक आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून रेशन वितरणास महिना अखेर उजाडू लागला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दर महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागत आहे. जिल्ह्यात बीपीएल, एपीएल आणि अंत्योदर कार्डधारकांची सं़ख्या मोठी आहे. यापैकी बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना अन्नभाग्य योजनेंतर्गत मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र, रेशन पुरवठा वेळेवर होत नसल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत.
जुलै महिन्यापासून 3 किलो ज्वारीचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे मासिक रेशन वितरणास थोडा विलंब झाला आहे. मात्र धान्याचा पुरवठा रेशन दुकानाकडे केला जात आहे. येत्या आठवड्याभरात सर्व लाभार्थ्यांना रेशन वितरण केले जाणार आहे.नजीर अहमद, अन्न व नागरी पुरवठा खाते, सहाय्यक संचालक
दर महिन्याला रेशन वेळेत दिले जात नाही. महिन्याच्या अखेरीस रेशन वाटप केले जात आहे. त्यामुळे अडचणी वाढत आहेत. पूर्वी वेळेवर रेशन दिले जात होते. मात्र अलिकडच्या काही दिवसांत रेशन वाटप उशिराने होत आहे.मल्लव्वा सनदी,लाभार्थी