बेळगाव : यरगट्टीतील एका बालिकेवरील अत्याचार प्रकरण एकाने सोशल मीडियावर टाकले. त्यावरून पोलिसांनी तपास करत सदर संशयिताला दोन वर्षांनी अटक केली. तफेल अहंमद दादापीर नागर्ची (वय 22, रा. महालिंगपूर, ता. मुधोळ) असे संशयिताचे नाव आहे.
सदर तरुणाने दोन वर्षांपूर्वी यरगट्टीतील प्रार्थनास्थळात एका बालिकेवर अत्याचार केला होता. या प्रकरणाची पोस्ट पुनीत केरेहळ्ळी यांनी मंगळवारी (दि. 5) सोशल मीडियावर टाकली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 5 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील यरगट्टीतील प्रार्थनास्थळात एका बालिकेवर अत्याचार करण्यात आला. याच्या न्यायासाठी संबंधित बालिकेचे वडील अद्याप धडपडत आहेत. परंतु, त्यांना न्याय मिळालेला नाही. कृपया पोलिसांनी याचा सखोल तपास करून त्या बालिकेला न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाची ही पोस्ट आहे.
या घटनेबाबत जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकारांना सांगितले की, या पोस्टची शहानिशा करण्याची जबाबदारी जिल्हा सोशल मीडिया व्यवस्थापन समितीवर सोपवली होती. त्यांनी या घटनेत तथ्य असल्याचा शोध घेताना संबंधित बालिकेच्या कुटुंबाचे घर शोधून काढले. तेव्हा ही घटना खरी असल्याचे समजले. जिल्हा बालसंरक्षण विभागातर्फे फिर्याद लिहून घेत संबंधित संशयिताचा शोध सुरु केला. त्याला अटक करून पुढील तपास सुरू असल्याचे डॉ. गुळेद यांनी सांगितले.
संबंधीत बालिकेच्या पालकांना याची आधी फिर्याद का दिली नाही, असे आपल्या अधिकार्यांनी विचारले. तेव्हा त्यांनी मुलीच्या भविष्याचा विचार करुन फिर्याद दिली नसल्याचे सांगितले. आता देखील ते फिर्याद देण्यास राजी झाले आहेत. त्यामुळे, महिला व बाल संरक्षण विभागातर्फे फिर्याद घेऊन पुढील कार्यवाही केल्याचे डॉ. गुळेद यांनी सांगितले.