बेळगाव : महामेळाव्याला परवानगी देणार नसल्याने तो महामेळावा आयोजित करू नका, असा दबाव घालणार्या पोलिसांना महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आमची लढाई न्यायाची आहे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देत आहोत. त्यामुळे, परवानगी नसली तरी महामेळावा होणारच, असा निर्धार व्यक्त करतानाच या कामी पोलिस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मध्यवर्ती म. ए. समितीच्या प्रस्तावित महामेळाव्याबाबत चर्चा करण्यासाठी पोलिस प्रशासनाने समिती नेत्यांना बुधवारी (दि. 3) कॅम्पमधील खडेबाजार विभागाच्या एसीपी कार्यालयात पाचारण केले होते. तिथे पोलिस उपायुक्त नारायण बरमणी यांनी समिती नेत्यांबरोबर चर्चा केली.
सरकार सुवर्णसौधमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरवत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून म. ए. समितीकडून दरवर्षी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेळगावात महामेळावा भरविला जातो. यंदा सोमवारी (दि. 8) महामेळावा भरविण्यात येणार आहे. या महामेळाव्याला परवानगी द्यावी, अशी रीतसर मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. आम्ही न्याय मार्गाने लढा देत आहोत.
तरीही प्रत्येक वेळी आम्हाला परवानगी नाकारली जातेय. हे चुकीचे असून आम्हाला महामेळावा भरविण्यास परवानगी द्या, अशी मागणी समिती नेत्यांनी केली. पोलिस उपायुक्त बरमणी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आम्ही महामेळाव्याला परवानगी देऊ शकत नाही. त्यामुळे, महामेळावा रद्द करावा, असे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देत काहीही झाले तरी महामेळावा भरविणारच असे समिती नेत्यांनी स्पष्ट केले. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, अॅड. एम. जी. पाटील, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, एसीपी शेखरप्पा एच., खडेबाजारचे पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी आदी उपस्थित होते.