लग्नाच्या नावाखाली फसवणूक (Pudhari File Photo)
बेळगाव

Fake Marriage Scam | "लग्नाळूंची फसवणूक : काही दिवसांचं नातं आणि नंतर गायब!"

Wedding Fraud | आजकाल लग्नासाठी मुली मिळणे कठीण होऊन बसले आहे, तरुण अडकतायत जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

दोन लाख घेऊन लग्न केले. परंतु पाचव्या दिवशी वधू पसार झाल्याचा प्रकार चिकोडी तालुक्यात उघडकीस आला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण असून अशी फसवणूक गेल्या सात-आठ वर्षांपासून सर्वत्र सुरू आहे. मुलींची संख्या कमी असल्याने लग्नाळूंना लालूच दाखवत पैसे उकळायचे अन् थोडे दिवस राहून पळून जायचे, असा प्रकार आजकाल सर्रास सुरू आहे.

संजय सूर्यवंशी, बेळगाव

गेल्या आठवड्यात चिकोडी तालुक्यात एक घटना घडली. एजंटांच्या मध्यस्थीने वधूपक्षाला दोन लाख रुपये दिले. लग्नही थाटात झाले. पूजा झाली. पाच दिवस कशीबशी सासरी राहिलेली नववधू माहेर जाऊन येते म्हणून गेली. जाताना दागिने, कपडे घेऊन गेली ती परतलीच नाही. तिचा फोन बंद, घरचेही गायब अन् एजंटनेही हात वर केले. हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. त्या तरुणाने तक्रार करण्याची धमकी दिल्याने हे प्रकरण समोर आले अन् त्याला थोडेफार पैसे परत मिळाले. परंतु, समाजात आज मुली दाखवण्याच्या नावाखाली एजंटांकडून अन् मुलीच्या नावावर रक्कम उकळायला बसलेल्या पालकांकडून सर्रास असा प्रकार सुरू आहे.

मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने एजंटगिरी

आजकाल लग्नासाठी मुली मिळणे कठीण होऊन बसले आहे. मुलगा तिशी ओलांडून चाळीशीकडे चालला तरी मुली मिळेनात. नेमका याचाच फायदा उठवत एजंटगिरी सुरू झाली आहे. मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने हे एजंट पैसे उकळत आहेतच. परंतु, लग्न ठरल्यानंतरही लाखात रक्कम घेतली जात आहे. इतके करूनही नवरी सासरी राहील याची खात्री देखील राहिलेली नाही.

तीन मुलींचा बाप करोडपती

बेळगावात घडलेली, परंतु कुठेही न छापून आलेली घटना. कधीकाळी आपल्या तीन चिमुकल्या मुलींना सोबत घेऊन आपले 50 हजाराचे कर्ज माफ व्हावे म्हणून बँक अन् सरकारी दरबारी खेटे घालणारा या मुलींचा बाप आज करोडपती आहे. फक्त करोडपतीच नव्हे तर त्याने तीन मजली घर बांधले आहे. हे सगळे कसे घडले, याची तितकीच रंजक कहाणी आहे.

पूर्वीचा हा गरीब बाप काहीही कामधंदा करत नाही. पत्नीच्या निधनानंतर दहा बाय दहाच्या खोलीत तीन मुलींचा सांभाळ स्वतःच केला. तिन्हीही मुली एकीपेक्षा एक देखण्या. त्या वयात आल्यानंतर तर आणखीच आकर्षक दिसू लागल्या. गेल्या दशकापासूनची स्थिती पाहिली तर मुलांना लग्नासाठी मुली न मिळणे ही देशव्यापी समस्या बनत चालली आहे. नेमका याचाच फायदा कसा उठवायचा, याची आयडिया या बापाला एका लग्न जुळवणार्‍या एजंटने दिली. आधीच गरिबी, त्यामुळे ही आयडिया बापालाही पटली.

परराज्यातील सावज

तिन्ही मुली जेव्हा अठरा ते 22 च्या झाल्या तेव्हा त्याने या मुलींसाठी स्थळे पाहायला सुरवात केली. स्थळ पाहताना स्थानिक न पाहता राजस्थान, गुजरात किंवा अन्य राज्यातील असावे याकडे कटाक्ष ठेवला. विशेषतः अन्य राज्यांच्या तुलनेत राजस्थानमध्ये मुलींची कमतरता अधिक आहे. बेळगावसह जिल्ह्यात तिकडून मुली पाहायला येणार्‍यांची संख्या देखील अधिक आहे. याचाच फायदा उठवत एजंट व मुलीच्या बापाने मुली दाखवण्यास सुरुवात केली. परंतु, लग्नासाठी वरपक्षाकडून किमान 10 लाख रुपये उकळायचे, असा प्रकार सुरू केला. राजस्थानात मुली मिळत नसल्याने आणि सुंदर बायको मिळते म्हटल्यानंतर वरपक्षाकडील मंडळी आणि मुलगा ही रक्कम देऊन लग्नाला तयार होत असे. सगळा खर्च वरपक्षाचा, मुलीला घातले जाणारे सोने वेगळे आणि वरती रक्कम असे थाटामाटात लग्न करायचे. मुलगी आठ दिवस ते महिनाभर परराज्यात जायची आणि इकडे आली की पुन्हा जायचीच नाही. हे सर्व पूर्वनियोजित असल्याने जरी नवरा न्यायला आला तरी त्यालाच धमकी देऊन परत पाठवायचे. असा प्रकार एजंट आणि मुलीच्या बापाने सुरू केला. मिळणारी रक्कमही परस्परात वाटून घ्यायची अन् दुसरे लग्नाळू सावज शोधायचे असे करत एकेका मुलीचा अनेकदा विवाह करून मोठी रक्कम उकळली. यातून आज तो बाप श्रीमंत झाला आहेच. परंतु, त्या मुलीही अगदी ऐषआरामात जगतात. सध्या कुठेतरी खासगी नोकरी करत असल्याचे दाखवायचे अन् स्थळ आले की पुन्हा बोहल्यावर चढायचे, असा हा प्रकार सुरू आहे.

प्रकरण पोलिसांत, वरपक्षाला दम

लग्न करून नेलेली बायको येत नाही म्हणून एक प्रकरण पोलिस ठाण्यातही गेले होते. परंतु, जेव्हा वरपक्षाकडील पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्या तरुणीने आपला तिकडे घरी छळवणूक करतात, मारबडव करून हुंडा मागतात अशी उलट तक्रार त्यांच्यावरच केली. त्यामुळे घाबरलेल्या या कुटुंबीयांनी काढता पाय घेत आपले राज्य गाठले. लग्नाळूंची ही लग्नं म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीनुसार सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था त्यांची होते. त्यामुळे अशी शेकडो प्रकरणे होत असूनही ती समोर कधीच येत नाहीत, हे भयाण वास्तव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT