App scam (File Photo)
बेळगाव

Market Master App Scam | अल्प मुदतीत दुप्पट, तिप्पट रकमेचे आमिष

निपाणी परिसरात कोट्यवधींची फसवणूक : मार्केट मास्टर अ‍ॅपला अनेकजण बळी

पुढारी वृत्तसेवा

राजेश शेडगे

निपाणी : ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ असे म्हटले जाते. याचे प्रत्यंतर नुकताच आले. अल्प मुदतीच्या गुंतवणुकीने निपाणी भागातील अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. मार्केट मास्टर अ‍ॅप या नावाने अल्प मुदतीच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून या मार्केट मास्टर अ‍ॅपच्या मास्टर माईंडने निपाणी परिसरातून कोट्यावधी रुपये हडप केले आहेत. मात्र याबाबत कोणतीही तक्रार पोलिसांत करण्यात आलेली नाही, याबाबत आश्चर्य वाटते.

मार्केट मास्टर अ‍ॅपच्या मास्टर माईंडने 300 पासून 9000 रुपयांपर्यंत सुरुवातीला गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस व 90 दिवसांत गुंतवणूक केलेली रक्कम दोनपट तीनपट व चारपट देण्याचे आमिष दाखवल्याने ज्यादा तर शिक्षकांनीच या योजनेचा प्रसार आणि प्रचार केला. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या रकमेचा फायदा मिळाला. मात्र जसजसे दिवस जाऊ लागले तशी गुंतवणुकीची वेगवेगळी ऑफर या मास्टर माईंडने दाखवून हजारो रुपयांपासून लाखो रुपये गुंतवून घेतले.

शुक्रवार दि.18 जुलै रोजी 12 हजार रुपये काही तासांसाठी गुंतवणूक करा व महिन्यानंतर 36 हजार रुपये मिळवा, असा भुलभुलैय्या दाखविल्याने यामध्ये अनेकांनी आपले पैसे गुंतवले. परंतु शनिवारी व रविवारी बँकेचे कामकाज बंद असते, असे कारण सांगून ही रक्कम परत देण्यात आली नाही. या कालावधीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. सोमवार दि. 21 रोजी मार्केट मास्टर अ‍ॅप बंद करण्यात आले. त्या मास्टर माईंडने गुंतवणूकदारांची फसवणूक करताना आयकर अधिकार्‍याची कारवाई झाल्याने अकाउंट लॉक झाले आहे ते अनलॉक करण्यासाठी 6000 रुपये भरावे असे सांगितले. त्यानंतर अनेकांनी 6000 रुपये भरले. हे सर्व पैसे घेतल्यावर या मास्टरमाईंडने मार्केट मास्टर अ‍ॅप बंद केले आहे. त्यामुळे निपाणी परिसरातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

विशेष म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या पालकांना यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. काही शिक्षकांनी आपण 50 टक्के गुंतवणुकीला जबाबदार राहू, असेही सांगितले. त्यामुळे सामान्य नागरिक बचत गटातील महिलांनी तर कर्ज काढून गुंतवणूक केली. दहा ते बारा हजार रुपये पगार असणार्‍या कामगारांनी चांगला परतावा मिळतो म्हणून यामध्ये गुंतवणूक केली.

श्रीपेवाडी येथील एका इसमाने म्हैस खरेदीसाठी 60 हजार रुपये ठेवले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो म्हणून त्याने 60 हजार रुपये या योजनेत गुंतवले. मात्र, आत पैसेही गेले आणि म्हैसही नाही अशी अवस्था झाली आहे. उच्चशिक्षित व्यक्तींनीही यामध्ये गुंतवणूक करावी याचे आश्चर्य वाटते. ऑनलाईन फसवणुकीचे फंडे रोज ऐकिवात येतात. हे माहीत असतानादेखील चांगले शिक्षित लोक या फसवणुकीला भुलले कसे, याचे आश्चर्य वाटते.

फसवणुकीचा भुलभुलय्या

राष्ट्रीयीकृत बँकेचा व्याजदर व फसवणुकीत मिळणारा परतावा याकडे का पाहिले जात नाही. राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये सध्या एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 6.25 टक्क्यांपासून 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जात आहे. मग केवळ दोन दिवसांत तीनशे रुपयांच्या गुंतवणूक वर 30 रुपये कसे मिळतात, याचा हिशेब शिक्षित मंडळी का करत नाहीत. त्यामुळे यापासून वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT