बेळगाव : कन्नडसक्तीच्या आदेशातून विवादित सीमाभाग वगळावा. कन्नडसक्ती अशीच सुरू राहिली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. त्याचे पडसाद कर्नाटक आणि महाराष्ट्रातही उमटतील, असा इशारा म. ए. युवा समिती सीमाभागच्या कार्यकर्त्यांनी देताच पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सार्या प्रकरणाची माहिती घेण्यात येईल व मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
म. ए. युवा समिती सीमाभागच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 20) अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली गोकाकमध्ये पालकमंत्री जारकिहोळी यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. प्रशासनाकडून बेळगाव महापालिका आणि इतर ठिकाणी कन्नडसक्ती करण्यात येत आहे. मराठी फलक हटविले गेले आहेत. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने आपण लक्ष घालून कन्नडसक्ती त्वरीत मागे घ्यावी, अशी विनंती केली.
मराठी भाषिकांवर कन्नडसक्ती करण्यात आली आहे. सीमाप्रश्नामुळे बेळगाव परिसरातील गावे हा विवादित भाग आहे. हा भाग कन्नडसक्तीच्या आदेशातून वगळण्यात यावा. या आदेशाची उर्वरित कर्नाटकात अंमलबजावणी करण्यात यावी. पण ही सक्ती अशीच सुरू राहिल्यास आम्हाला रस्त्यात उतरून आंदोलन करावे लागेल. त्याचे पडसाद कर्नाटकासह महाराष्ट्र राज्यातही उमटतील. त्यामुळे, आमची मागणी मान्य करावी, अशी विनंती अध्यक्ष शेळके यांनी केली.
मी या सार्या प्रकाराची माहिती घेतो. त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री जारकिहोळी यांनी दिली. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रवीण रेडेकर, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, अभिजीत मजुकर, अशोक घगवे, नारायण मुचंडीकर, भागोजी पाटील, निपाणी युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, रणजीत हावळाण्णाचे, मोतेस बारदेसकर, सचिन दळवी, गजानन शहापूरकर, एपीएसी माजी अध्यक्ष निंगाप्पा पाटील, सुरज कणबरकर, प्रविण गौडर, गणेश मोहिते, विनायक कांगले आदी उपस्थित होते.
कन्नडसक्तीविरोधात युवा समितीने याआधी महापौर मंगेश पवार यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठले असून, आता पालकमंत्री जारकिहोळी यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतरही लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.