बेळगाव : मराठीची कावीळ झालेल्या महापालिकेने गुरुवारी (दि. 24) सर्वसाधारण सभा सुरू होण्याआधी आतापर्यंत झालेेले महापौर, प्रशासक यांच्या नावांचे मराठी भाषेतील फलक हटविले.
महापालिकेच्या मुख्य सभागृहात मराठी आणि कन्नड भाषेत आतापर्यंत झालेल्या महापौर आणि प्रशासकांचा फलक होता. त्यावर महापौर आणि प्रशासक यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करण्यात आला होता.
पण, मराठीची काविळ झालेल्या महापालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरु होण्यापूर्वी मराठी भाषेतील दोन फलक हटविले.सभागृहाचे नूतनीकरण करताना सभागृहातील मराठी आणि कन्नड भाषेतील फलक बाजूला काढले होते. ते पुन्हा सभागृहात लावण्यास सांगण्यात आले. त्यामुळे, कर्मचार्यांनी मराठी आणि कन्नड भाषेतील फलक पुन्हा लावले.
हे मराठी फलक लावल्याचे आढळून येताच कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांचा पारा चढला. त्यांनी हे फलक याठिकाणी लावण्यास तुम्हाला कुणी सांगितले, असे ओरडत तेथून काढण्यास सांगितले. या प्रकारातून सभागृहातून मराठी गायब करण्यात आली.