बेळगाव : त्रिभाषा धोरणाच्या ठरावाला केराची टोपली दाखवत महापालिकेत शंभर टक्के कानडीकरण करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी जोरदार आवाज उठविला. पण, सत्ताधारी भाजपमध्ये बहुसंख्य नगरसेवक मराठी भाषिक असूनही मराठीच्या मागणीवर विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे, समिती नगरसेवकांनी सभात्याग करून निषेध नोंदविला.
महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी (दि. 24) महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महापालिकेत केलेल्या कानडीकरणाविरोधात तीव्र पडसाद उमटले.
सभेला सुरुवात होताच म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनी उभे राहून महापालिकेत बेकायदेशीरपणे कन्नडसक्ती करण्यात आल्याचा मुद्दा मांडला. कन्नडसोबत असलेले इतर भाषेतील फलक काढण्यात आले आहेत. मराठी भाषेतून नोटीस देण्यात आलेली नाही, असा जाब त्यांनी विचारला. त्याला सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. एकीकडे समिती नगरसेवक मराठीची मागणी करत असताना भाजप नगरसेवक त्याला विरोध करत होते. या प्रकाराला सरकारनियुक्त काँग्रेस नगरसेवकांनीही पाठिंबा दिला.
आम्ही सरकारच्या आदेशाचे पालन करणार आहोत. तुम्हाला मराठी कागदपत्रे पाहिजे असल्यास महाराष्ट्रात जा. महाराष्ट्रातील अक्कलकोट, जत भागात कन्नड लोकांना कन्नड मध्ये कागदपत्र देतात का, असा सवाल करत भाजप आणि सरकारनियुक्त काँग्रेस नगरसेवक यांनी विरोध केला. तर काहींनी विषयपत्रिकेनुसार बैठक घेण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे, सभागृहात एकच गोंधळ उडाला. महापौरांनी सर्वांना शांत करण्याचे प्रयत्न केले. पण, गोंधळ वाढत असल्यामुळे अखेर त्यांनी सभागृह पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले. त्याचवेळी समिती नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवत सभात्याग केला.
दुपारी सव्वा एकच्या दरम्यान सभा पुन्हा सुरु झाली. यावेळी सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली यांनी सभागृहात कसे बोलायचे, याबाबत कायदा सल्लागार बी. एम. जिंग्राळकर यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी केएमसी कायद्यातील कलमाचाही उल्लेख केला. कायदा सल्लागारांनी ते कलम वाचून दाखवले. त्यानंतर कोंगाली यांनी सभागृहात समितीने नगरसेवकांचे वर्तन राजद्रोह ठरु शकते. त्यांचे सदस्यत्वही जाऊ शकते, असे सांगून भीती घालण्याचा प्रयत्न केला.
म. ए. समितीच्या नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख न करता बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी जोरदार टीका केली. सभागृहात बोलण्याची त्यांची पद्धत बरोबर नाही. नेहमी एक गुप्त अजेंडा घेऊन ढोंगीपणा करत असतात. गोव्यातून काय येते, हे आम्हाला माहिती आहे. पण, आम्ही गप्प आहे म्हणून त्यांचे चालले आहे. पेपरवाले त्यांना विनाकारण प्रसिद्धी देतात. सरकारच्या आदेशाचे पालन करण्याचा विषय आहे. त्यावर सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. पण, प्रसिद्धीसाठी यापुढे असे नाटक केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली.