56 कोटींचे ड्रग्ज बंगळुरात जप्त 
बेळगाव

Drug trafficking : 56 कोटींचे ड्रग्ज बंगळुरात जप्त

महाराष्ट्र टास्क फोर्सची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्राच्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पथकाने बंगळूर येथे कारवाई करीत तब्बल 55 कोटी 88 लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. तसेच या अमली पदार्थाचे तीन कारखानेही नष्ट केले आहेत. या कारखान्यांतील ड्रग्ज देशातील अनेक शहरांत वितरित केले जात होते. त्यातून आरोपींनी मोठ्या प्रमाणात शहरात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. आतापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक केली आहे, तर त्यांचे दोघे साथीदार फरार आहेत.

महाराष्ट्र शासनाने अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर प्रभावी कारवाई करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्यची स्थापना केलेली आहे. सध्या महाराष्ट्रात 7 ठिकाणी विभागीय कृती कार्यालये स्थापन झालेली असून अमली पदार्थ तस्करीविरोधी पथकांनी कारवाईस सुरुवात केली आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स महाराष्ट्रच्या कोकण पथकाने 21 डिसेंबर रोजी नवी मुंबईत वाशी गावातील पुणे-मुंबई महामार्गाजवळ जुना बसथांबा येथे अब्दुल कादर रशीद शेख याला पकडून 1 कोटी 48 लाख 80 हजार रुपये किमतीचे 1 किलो 488 ग्रॅम एमडी जप्त केले होते. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, तपास करीत असताना या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे पथकाच्या लक्षात आले होते. त्यांनी आरोपी अब्दुल कादरची सखोल चौकशी केल्यावर बेळगाव येथे राहणारा व एमडी ड्रग्ज तयार करणारा प्रशांत यल्लापा पाटील याचे नाव निष्पन्न झाले. त्याला पथकाने ताब्यात घेतले. पाटीलच्या चौकशीतून एमडी ड्रग बंगळूर येथील तीन कारखान्यांत तयार केले जात असल्याचे पुढे आले. त्यानंतर पथकाने थेट बंगळूर गाठून राजस्थानात कायमचे वास्तव्य असणारे; परंतु बंगळूर शहरात एमडी ड्रग्जचा अवैध व्यवसाय करणारे सुरज रमेश यादव व मालखान रामलाल बिष्णोई या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल करीत बंगळूर शहरातील स्पंदना लेआऊट कॉलनी, एनजी गोलाहळी भागात आर. जे. इव्हेंट नावाची फॅक्टरी तसेच येरपनाहळ्ळी कन्नूर येथील लोकवस्तीतील एका आरसीसी घरात एमडी ड्रग्ज तयार करण्याचे कारखाने दाखविले. या तिन्ही ठिकाणी पथकाने छापा टाकून 4 किलो 100 ग्रॅम एमडी तसेच द्रवस्वरूपातील 17 किलो एमडी असे एकूण 21 किलो 400 ग्रॅम एमडी, एमडी तयार करण्याची यंत्रसामग्री आणि विविध रसायने, असा एकूण 55 कोटी 88 लाख 90 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून या तिन्ही ठिकाणांचे एमडी ड्रग्जचे कारखाने नष्ट केले आहेत. ही कारवाई अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, उप महानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात पुणे कृती गटाचे पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार, अपर पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे, कोकण कृती गटाचे पोलिस उप अधीक्षक रामचंद्र मोहिते, पोलिस निरीक्षक संतोष गावशेते, नीलेश बोधे, स.पो.नि. उदय काळे, माधवानंद धोत्रे यांच्या पथकाने केली.

4 अटकेत, दोघे फरार

बंगळुरातील लोकवस्तीत तीन कारखान्यांत बनविलेले एमडी भारतातील अनेक राज्यांमध्ये वितरित केले जात होते. ड्रग्ज विक्रीतून आरोपींनी बंगळूर शहरात मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. चार संशयितांना अटक करण्यात आलेली आहे, तर अद्याप दोन आरोपी फरार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT