

नेरळ : आनंद सकपाळ
नेरळ पोलीस ठाणे ह6ीतील ताडवाडी गावातील ग्रामस्थांची सतर्कता आणि धाडसी पूढाकार यामुळे माळरानावरील निर्जन ठिकाणावरील घरामध्येच सुरु असलेला मॅफेड्रॉन ( एमडी ) ड्रग्जचा बेकायदा कारखाना नेरळ पोलीसांना सोमवारी उध्वस्थ करण्यात यश आले असून, या कारवाईत मॅफेड्रॉन ड्रग्ज निर्मीतीचे रसायन, यंत्रणा आदि 16 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पाच आरोपींना ग्रामस्थांच्या सक्रीय सहयोगामुळे अटक करण्यात यश आले आहे.
अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना न्यायलयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांनी पोलीस कोठडी सूनावली असल्याची माहिती कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींमध्ये जावेद अहमद शेख (वय 38, रा. इस्लामपूर, कुंभारवाडा, धारावी मुंबई), सचिन राममिलन जैसवार ( वय 31, रा. जीएनएम प्रेमनगर, सायन, मुंबई), मोहम्मद जाफर मोहम्मद अली(वय 39, रा. सिया पोस्ठवाडा, माहिम, मुंबई), अमित अशोककुमार कोरी ( वय 3, रा. शितल प्लाऊड कंपनी, सायन मुंबई ), भरत सिध्देश्वर जाधव (वय 36, रा. वर्धमान वाटीका, ता. शहापूर जि. ठाणे) यांचा समावेश आहे तर सहावा आरोपी घरमालक लक्ष्मण देवराम फसाळ (रा. ताडवाडी, ता. कर्जत) हा फरार असून त्याचा शोध नेरळ पोलीस घेत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांनी पूढे सांगीतले.
जप्त रसायन एमडी ड्रग्ज निर्मितीचेच रसायन
आरोपी सचिन राममिलन जैसवार हा डी.फार्मा पदवी संपादन केलेला तरुण आहे. त्यास रसायनांचे ज्ञान आहे, त्याच्याच ज्ञानाच्या आधारे येथे एमडी ड्रग्ज निर्मीतीचा कारखाना घरात चालवण्यात येत होता. पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेले रसायन हे फॉरेन्सिक लॅबच्या तपासणी नंतर मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्स निर्मीतीकरिताच वापरण्यात येणारे रसायन असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे रसायन त्यांनी नेमके कुठून आणले आणि बेकायदेशीररित्या तयार होणारे एमडी ड्रग्ज ते कुठे विक्री करित होते, त्याच बरोबर आतापर्यंत त्यांनी किती एमडी ड्रग्जची निर्मीती केली याचा शोध पोलीस घेत आहेत. यातून अन्य आरोपींचा देखील उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई मधील चार आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील एक अशा या पाच आरोपींनी कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ताडवाडी गावाची निवड आपल्या बेकायदा उद्योगासाठी करुन येथील लक्ष्मण देवराम फसाळ (रा. ताडवाडी, ता. कर्जत) यांचे छोटे घर भाड्याने घेतल्याचे आता पयर्र्ंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे. 10 ऑगस्टच्या रात्री या घरामंध्ये काही संशयास्पद हलचाली दिसून आल्याने, ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून नेरळ पोलीसांना या बाबतची माहिती दिली. आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पोलीस टीमसह रात्रीचे सुमारास छापा टाकून धडक कारवाई केली.
या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्यान्वये सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल,अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, खालापूर उपविभागीय पोलीस अधीकारी विशाल नेहुल, कर्जत उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल गायकवाड व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक नितिन मंडलिक हे या प्रकरणी पूढील तपास करीत आहेत.
रायगड पोलीसांच्या आवाहनास ग्रामस्थांचा प्रतिसाद
रायगड जिल्ह्यात या पुर्वी घडलेल्या अमली पदार्थ विषयक गुन्ह्यातील आरोपींना अटक केल्यावर रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रायगडमधील नागरिकांना सतर्क राहाण्या बाबत आवाहन केले होते. या अंतर्गत आपल्या गावांत अपरिचित व्यक्तींचा वावर, संशयास्पद हालाचाली आढळून आल्यास त्या बाबत पोलीसांना कळवण्यास सांगीतले होत.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात देखील जनजागृती करण्यात येत आहे. त्यातूनच नेरळ मधील ताटवाडी ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून आरोपीं असलेल्या घरास घेराव घावून आरोपींना पोलीसांच्या ताब्यात दिले ही सकारात्मक बाब मानली जात आहे.