बेळगाव : दक्षिण भारत विभागाचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांनी गुरुवारी (दि. 26) मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट दिली. त्यांनी दिवसभरात मिलिटरी हॉस्पीटल व आर्मी पब्लिक स्कूलची पाहणी केली. तसेच अग्निवीरांसह माजी सैनिकांशी संवादही साधला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी त्यांच्यासोबत होते.
लेफ्ट. जनरल ब्रार यांनी रेजिमेंटल सेंटरचे कामकाज आणि प्रशिक्षणाची पाहणी केली. प्रशिक्षण आणि प्रशासकीय पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या भरीव प्रगतीबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. विशेषतः अग्निवीर प्रशिक्षणाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. भारतभूमीच्या रक्षणासाठी सैनिक भविष्यासाठी तयार हवेत. युद्धभूमीच्या गतिशीलतेशी जुळवून घेण्यास सक्षम असायला हवेत याची खात्री प्रशिक्षण काळात व्हायला हवी. प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
त्यानंतर त्यांनी मराठा इन्फंट्रीतील विविध स्टेशन युनिट्सना भेट देऊन माहिती घेतली. त्याबरोबर माजी सैनिकांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या देशसेवेची प्रशंसा केली. तसेच आर्मी पब्लिक स्कूलला भेट देऊन विविध स्तरांवर खेळात उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत जीवनात सतत प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला.
या भेटीचे औचित्य साधून लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्या हस्ते लष्करी रुग्णालयातील नव्याने स्थापित बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) उद्घाटन केले. या ठिकाणी सैन्यात कार्यरत कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात याची माहिती देण्यात आली.