धरणाचे सर्व 26 दरवाजे उघडून तब्बल 1.10 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे Pudhari
बेळगाव

Almatti Dam Discharge | कोल्हापूर, सांगलीला दिलासा : अलमट्टी धरणाच्या 26 दरवाजांतून 1.10 लाख क्युसेक विसर्ग सुरू

बागलकोट, विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Almatti Dam 26 Gates Opened

दिपक शिंत्रे

विजयपूर : महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम आलमट्टी धरणावर झाला आहे. धरणाने यंदाच्या हंगामात प्रथमच जवळपास पूर्ण क्षमतेचा टप्पा गाठला असून वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे प्रशासनाने धरणाचे सर्व 26 दरवाजे उघडून तब्बल 1.10 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

गुरुवारी (दि.३०) सकाळी विसर्गाचे प्रमाण किंचित कमी करण्यात आले असले तरी नदीपात्र अद्याप दुथडी भरून वाहत आहे. धरण प्रशासनाने आज दुपारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार धरणाची पाणीपातळी 519.25 मीटर (R.L.) इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण पाणीसाठा 117.038 टीएमसी, तर जिवंत पाणीसाठा 99.418 टीएमसी इतका आहे. धरणात सरासरी 83,386 क्युसेक पाण्याची आवक होत असून एकूण जावक 97,078 क्युसेक आहे.

सध्या कालवा सिंचनासाठी 453 क्युसेक, तलाव भरण्यासाठी 585 क्युसेक, वीज निर्मितीसाठी 42,500 क्युसेक, स्पिलवेमधून 53,125 क्युसेक तसेच इतर वापरासाठी 415 क्युसेक पाण्याचा वापर होत असून नदीपात्रात एकूण 95,625 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

अलमट्टी धरणाची कमाल साठवण क्षमता 519.60 मीटर पातळीवर 123.081 टीएमसी इतकी असून धरण पूर्ण क्षमतेपासून अवघ्या 35 सेंटीमीटर अंतरावर आहे. बुधवारी सायंकाळी धरणाची पातळी 519.34 मीटर झाली होती. त्यावेळी वाढत्या आवकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने यंदाच्या वर्षातील पहिल्यांदाच धरणाचे सर्व 26 दरवाजे उघडले होते. त्यावेळी वीज निर्मितीसाठी 42,500 क्युसेक आणि स्पिलवेमधून 67,500 क्युसेक, असा एकूण 1,10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

धरणात सातत्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असली तरी सलग दोन दिवस पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात पाणीटंचाईची भीती दूर झाल्याने कृष्णा काठच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने बागलकोट, विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढविण्यात येऊ शकते, असे अधिकारांनी स्पष्ट केले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव धरण परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून सर्व 26 दरवाज्यांतून होणारा विसर्ग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच नदीकाठच्या भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT