निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाका येथे कंटेनरच्या डिझेल टाकीला आग लागून स्फोट झाल्याने नाक्याला भीषण आग लागली. या घटनेमुळे टोल नाक्यावरील दोन केबिनसह शेडला बघता क्षणी आग भडकल्याने शिवाय कंटेरनचेही केबिन जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.ही घटना बुधवारी रात्री ९.३० च्या नऊच्या सुमारास घडली.
दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनासह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दरम्यान कंटेनर चालकाने आपला वेळीच बचाव करून घेतला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, टोलनाकाच्या लेन नंबर एकमधून बेळगावहुन मुंबईकडे तांदूळाची पोती घेऊन जाणारा मालवाहू कंटेनर टोलवर आला असता यावेळी डिझेल टाकीचा स्फोट होऊन आग कंटेनरच्या पुढील बाजूस भडकली.यावेळी आगीसह धुराचे लोट मोठ्या प्रमाणात उठल्याने आगीने टोल नाक्यावरील दोन केबीनना कवेत घेतले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वेळीच दुतर्फा बॅरिकेटस लावून पोलीस प्रशासनासह अग्निशमन दलाला पाचारण केले व वाहतूक रोखून धरली.
दरम्यान घटनास्थळी निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्यासह कोगनोळी आऊट पोलीस चौकीतील हवालदार प्रकाश तळवार यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव बाजूला केले.शिवाय परिसरातील १०० मिटर परिसर बंदिस्त ठेवला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रागा लागून राहिल्या होत्या.या काळात अग्निशमन दलाने मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले. शिवाय घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस आणि जादाचे पोलीस कुमक मागवुन बंदोबस्त ठेवला होता. ही आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती.
दरम्यान घटनास्थळी मदतीसाठी परिसरातील नागरिकांसह, उद्योजक वाहनधारकांनी धाव घेतली.शिवाय घटनेचे गांभीर्य ओळखून रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांनी कंपनीच्या ॲम्बुलन्सला पाचरण करून घटनास्थळी थांबवून ठेवले.ग्रामीण पोलीसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास चालवला आहे.