खानापूर : कुसमळीमार्गे वाहतूक बंद असल्याने खानापूर-जांबोटी मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. अवजड वाहने, दोन्ही राज्यांच्या बससेवा यासह नियमित प्रवासी वाहनांचा भार पडल्याने रविवारी (दि. 29) रहदारी कोंडीचा सामना करावा लागला.
विकेंडमुळे पर्यटनासाठी कणकुंबी, जांबोटीला जाणार्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. या गर्दीचा ताण पडल्याने खानापूर-जांबोटी मार्गावर जागोजागी अनेक ठिकाणी चक्काजाम परिस्थिती निर्माण झाली होती. खानापूर शहराजवळील बाचोळी क्रॉसपासून रामगुरवाडी क्रॉसपर्यंत वाहनांची रीघ लागली होती.
जवळपास तासभर चक्काजाम झाल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. या मार्गावरील मंगल कार्यालयात एक विवाह सोहळाही होता. त्या विवाह सोहळ्यातील वाहनांची रस्त्यावर भर पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. खानापूर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
रहदारी कोंडीमुळे पश्चिम घाटात वर्षा पर्यटनासाठी चाललेल्या पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषता कुटुंबांसमवेत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी चाललेल्यांचे हाल झाले. बराच काळ कोंडीत अडकून पडावे लागल्याने अनेकांचे नियोजन कोलमडले होते. त्याशिवाय गोव्याला चाललेल्या व तिकडून येत असलेल्यांनाही कोंडीचा फटका बसला. कुसमळीहून रहदारी सुरु होईपर्यंत हा त्रास वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.