खानापूर : दुचाकी व कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वार ठार झाला, तर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. जांबोटी-चोर्ला मार्गावरील जांबोटी गावच्या हद्दीत ग्रीन कॅसल हॉटेलजवळील वळणावर रविवारी (दि. 29) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.
दर्शन मोहन चौहान (वय 20, रा. रेवडीहाळ, ता. हुबळी) असे मृताचे नाव आहे. तर रघु कल्लाप्पा शिरकोळ (रा. रेवडीहाळ) गंभीर जखमी आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कुट्टलवाडीतील (ता. बेळगाव) विनायक विजय कदम हा कंटेनर (केए 22 एए 9574) घेऊन जांबोटीच्या दिशेने येत होता. जांबोटीजवळील एका वळणावर समोरुन येणार्या स्प्लेंडर दुचाकीची व कंटेनरची भीषण धडक झाली.
या धडकेत दर्शनच्या तोंड, डोके आणि पायांना तसेच मागे बसलेल्या रघु याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तथापि रक्तस्त्राव होऊन दर्शन याचा काही वेळातच मृत्यू झाला. खानापूर पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.