

मिरज : तालुक्यातील मल्लेवाडी ते बेडग मार्गावर दुचाकीसह ‘म्हैसाळ’च्या कालव्यात पडून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुदर्शन सुरेश माने (वय 23, रा. बेडग रोड, मल्लेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवार दि. 26 जूनरोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबतची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुदर्शन हा गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून मल्लेवाडी-बेडग मार्गावर असलेल्या चव्हाण वस्तीच्या दिशेने चालले होते. ते दुचाकीसह कालव्यात पडले. गंभीर जखमी झालेल्या सुदर्शन यांना नातेवाईकांनी उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संजय झोडगे यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.