बेळगाव: पुढारी वृत्तसेवा : बेळगावात घेतल्या जात असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती म. ए. समितीने सोमवारी (दि. 9) धर्मवीर संभाजी चौकात आयोजित केलेल्या महामेळाव्याची प्रशासनाने धास्ती घेतल्याचे दिसून आले. महामेळावा होणारच नाही अशी व्यवस्था करण्यात आली. लोकशाही मार्गाने सभास्थळी जाऊ पाहणारे म. ए. समिती नेते व कार्यकर्त्यांची धरपकड करुन अज्ञातस्थळी नेण्यात आले.
म. ए. समितीने महामेळावा आयोजनासाठी शहरातील पाचपैकी एका ठिकाणी महामेळावा भरवू देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र, पोलिस आयुक्तांनी महामेळाव्यालाच परवानगी नाकारुन शहरात पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश दिला होता. त्याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परवानगी नाकारल्याने धर्मवीर संभाजी चौकात महामेळावा भरविण्याचा निर्धार म. ए. समितीने केला होता. त्यामुळे, सकाळी सहापासूनच चौकात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग व उपायुक्त रोहन जगदीश तिथे तळ ठोकून होते.
समिती नेते व कार्यकर्ते गनिमीकाव्याने सभास्थळी येतील याची धास्ती असल्याने खबरदारी घेण्यात आली होती. काही समिती नेत्यांच्या घरासमोरच पोलिस तैनात करण्यात आले होते. महामेळाव्यासाठी घराबाहेर पडतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. अनेकांची वाटेतच धरपकड करण्यात आली. तरीसुद्धा नेते व कार्यकर्ते चौकात येतच होते. त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन पोलिस वाहनातून नेले जात होते. सकाळी आठपासून दुपारी साडेबारापर्यंत हा प्रकार सुरु होता. कार्यकर्ते सीमाप्रश्नाच्या घोषणा देत सभास्थळी जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पोलिस त्यांना वाटेतच अडवून ताब्यात घेऊन वाहनांत कोंबत होते. ताब्यात घेतलेल्यांना आधी एपीएमसी व नंतर मारिहाळ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे दिवसभर स्थानबद्ध करुन सायंकाळी उशीरा सोडून देण्यात आले.
मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व सहकार्यांना जत्तीमठाच्या कोपर्यावरच ताब्यात घेण्यात आले. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, खानापूर समितीचे गोपाळ पाटील, अनिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आदींना रंगुबाई पॅलेसजवळ ताब्यात घेतले गेले. माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, माजी ता. पं. सदस्या कमल मन्नोळकर, मदन बामणे, अॅड. अमर येळ्ळूरकर, आर. के. पाटील, श्रीकांत मांडेकर, शिवानी पाटील, श्रीकांत कदम, प्रकाश चव्हाण, माजी जि. पं. सदस्य रमेश करेण्णावर, राजू पावले, भाऊ गडकरी, निरंजन सरदेसाई आदींसह अनेक कार्यकर्त्यांची संभाजी चौकात धरपकड करण्यात आली.
महामेळावा होऊ न देण्यासाठी पोलिस प्रशासनाने दडपशाहीचा मार्ग अवलंबिला होता. त्यामुळे, धर्मवीर संभाजी चौकाला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. याठिकाणी दुपारपर्यंत तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांच्या उपस्थितीमुळे सर्वसामान्य लोकांमध्येही दहशत निर्माण झाली होती. पोलिसांमुळे रहदारीलाही अडथळा निर्माण झाला होता.