बेळगाव ः राज्यात मुख्यमंत्री बदलाची वावटळ काही प्रमाणात शांत झाली असली तरी पूर्णपणे शमली नाही. अशातच आता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांना खऱ्याखुऱ्या वावटळीला सामोरे जावे लागले. त्यामध्ये ते सुदैवाने थोडक्यात बचावले.
राणेबेन्नूर येथे शनिवारी (दि. 3) मंत्री जारकीहोळी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता. कार्यक्रम संपवून मंत्री जारकीहोळी मंडपाच्या काही अंतरावर पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी मोठी वावटळ आली. त्यामध्ये कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मोठा मंडप कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण काही काळ स्तब्ध झाले. जारकीहोळी यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सुरक्षित स्थळी नेले. वावटळीत संपूर्ण मंडप जमीनदोस्त झाला. खुर्च्या व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडले. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमासाठी महिला, मुले व लोक मोठ्या संख्येने जमले होते. पण, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.