चिकोडी : कारवार जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात असणाऱ्या अरबाईल घाटातील बळगारजवळ आज (९ जुलै) पहाटे एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा रस्ता अपघात झाला. पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या 'तुफान क्रूझर' गाडीची आणि समोरून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सर्व मृत तरुण 'स्विगी'चे कर्मचारी; ट्रिप दरम्यान काळाचा घाला
अपघाताचा बळी ठरलेल्या तुफान क्रूझर गाडीमधील (KA 19 AA 5920) चालकासह सर्व ९ प्रवासी हे धारवाडचे रहिवासी होते. हे सर्व तरुण स्विगी (Swiggy) कंपनीत पार्ट-टाइम डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. बुधवार (८ जुलै) रात्री हे सर्वजण एकत्र येऊन धर्मस्थळ आणि चिकमंगळूर येथे पर्यटनासाठी (ट्रिप) निघाले होते. मात्र, आज पहाटे अरबाईल घाटातील बळगारजवळ पोहोचताच, समोरून येणाऱ्या एका ट्रकने (KA 22 AA 1008) त्यांच्या क्रूझरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की क्रूझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मृतांची आणि जखमींची नावे
अपघाताच्या तीव्रतेमुळे क्रूझरमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाने रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच दम तोडला. बसवराज (४८ वर्षे), अभिषेक ईश्वर (२८ वर्षे), अक्षय (२६ वर्षे), अभिषेक (२६ वर्षे), संजीव / संजय अंगडी (सहाव्या मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे) अशी मृतांची नावे आहेत. तर शिवराज दुर्गाप्पा मडीवाळ (२२ वर्षे), मंजुनाथ अशोक चुलकी (३२ वर्षे), सचिन चन्नबसय्या बसलिंगय्या संपगावा (२८ वर्षे) अशी ४ अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
पोलीस घटनास्थळी दाखल; धारवाडमध्ये शोककळा
घटनेची माहिती मिळताच यल्लापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी यल्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. धारवाडमधील मृत तरुणांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती देण्यात आली असून, ऐन उमेदीच्या वयातील तरुण मुले गमावल्यामुळे सर्व कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर हेलावून गेला आहे.