

Pimpri Chinchwad Doctor Death
पिंपरी-चिंचवड, पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील शहरातील थेरगाव येथील एका प्रतिष्ठित खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. डॉ. श्वेता रोकडे असे जीवन संपवेलल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.
या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. श्वेता रोकडे या रावेत येथील 'सेलेस्टीयल सिटी' सोसायटीमध्ये आपल्या इतर दोन मैत्रिणींसोबत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होत्या. थेरगाव येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात त्या वैद्यकीय सेवा देत होत्या. त्यांनी आज सकाळी अचानक इमारतीवरून उडी मारून टोकाचे पाऊल उचलले.
घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. श्वेता यांना उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिसांनी या घटनेची माहिती डॉ. श्वेता रोकडे यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. डॉ. श्वेता यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमागे काही घातपात आहे का? यासह सर्व संभाव्य शक्यता लक्षात घेऊन रावेत पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत."