धारवाड : बळ्ळारीचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका दिवसातच पवन नेज्जूर यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपाखाली सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. गंगावतीचे आमदार जनार्दन रेड्डी यांच्या निवासस्थानासमोर झालेल्या संघर्षप्रकरणी सरकारने निज्जूर यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
पोलिस अधीक्षक नेज्जूर यांनी 1 जानेवारी रोजी डॉ. शोभाराणी यांच्याकडून बळ्ळारीचा पदभार स्वीकारला होता. त्याच रात्री मावळत्या अधीक्षक डॉ. शोभाराणी यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक पार्टी आयोजित केली. त्यात नेज्जूर यांनी मद्यप्राशन केले होते. संध्याकाळी आमदार जनार्दन रेड्डी यांच्या निवासस्थानासमोर गोंधळ सुरु झाला होता. गोंधळ सुरु असतानाही पवन घटनास्थळी गेले नाहीत. गोंधळाचे आपत्तीत रुपांतर झाल्यानंतर डीजीपी डॉ. सलीम व एडीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) आर. हितेंद्र यांनी त्यांना फोन केला. मात्र, पवन यांनी फोन उचलला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चित्रदुर्गचे पोलिस अधीक्षक रणजीतकुमार यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले. नेज्जूर यांनी रात्री उशीरा घटनास्थळाला भेट दिली. मात्र, ते तिथे पोचण्यापूर्वीच इतर पोलिस अधिकारी तिथे पोचले होते. बळ्ळारी परिक्षेत्राच्या महानिरीक्षक वर्तिका कटियार यांनी त्यांच्या अहवालात या सर्व बाबींचा उल्लेख केला होता. ही बाब सरकारच्या निदर्शनास येताच त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निलंबनाची कारवाई होताच पोलिस अधीक्षक नेज्जूर यांनी आत्महत्या केल्याची अफवा पसरली. पण, त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आरोग्याच्या समस्येमुळे ते रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. त्यामुळे, ही अफवा पसरली होती.
असे आहे प्रकरण
वाल्मिकी पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी बॅनर लावण्याच्या मुद्यावरून काँग्रेस आमदार नारा भरत रेड्डी आणि भाजप आमदार जनार्दन रेड्डी यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला. त्यात सतीश रेड्डी नामक काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या चार दिवसांपूर्वी घडली. मात्र, आमदार रेड्डी यांच्या घरावरही अशाच प्रकारचा गोळीबार झाल्याचे उघड झाले आहे. त्यात निवासस्थानाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. अंगणात आणि घराच्या आत दोन गोळ्या सापडल्या आहेत, अशी माहिती आमदार रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. समाजकंटकांनी मला लक्ष्य करुन गोळीबार केला. एकूण आठ राउंड झाडण्यात आल्याचा व्हिडिओ उपलब्ध झाला आहे. याची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, गोळीबारप्रकरणी काँग्रेस आमदार नारा भरत रेड्डी यांचे निकटवर्तीय असलेल्या सतीश रेड्डी यांच्या दोन खासगी अंगरक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे ः गृहमंत्री परमेश्वर
बळ्ळारीतील प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे. या प्रकरणात गोळीबारातील बंदुका आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्या एफएसएल प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले.