Karnataka Anti Tobacco Law
कर्नाटक सरकारने सार्वजनिक आरोग्याहितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने हुक्का बारवर बंदी घालणारा नवीन तंबाखूविरोधी कायदा लागू केला आहे. आता तंबाखूजन्य उत्पादनांच्या खरेदीसाठी किमान कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे केले आहे. याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २३ मे रोजी सिगारेट्स आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरातींवर बंदी आणि व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन) (कर्नाटक सुधारणा) विधेयक, २०२४ ला मंजुरी दिली. त्यानंतर कर्नाटक सरकारने हा नवीन तंबाखूविरोधी कायदा लागू केला आहे.
या सुधारित कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि थुंकण्यास बंदी असेल. यातून सुमारे ३० खोल्या असलेले हॉटेल्स, ३० पेक्षा जास्त आसन क्षमता असलेली रेस्टॉरंट्स आणि विमानतळांवर निश्चित केलेल्या धूम्रपान क्षेत्रांना सूट दिली जाईल. पण सामान्य सार्वजनिक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
या कायद्यातील दुरुस्तीतील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हुक्का बारवर पूर्णपणे बंदी घालणे होय. या कायद्याचे उल्लंघन केल्यास एक ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि त्यासोबत ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
सुधारित कायद्यानुसार २१ वर्षांखालील कोणालाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध असेल. तसेच शैक्षणिक संस्थांपासून १०० मीटर अंतरावर तंबाखू विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.