बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
सत्ता हस्तांतरणावरून प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या जोरदार चर्चेदरम्यान सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून एक हजार दिवस पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार पुढील फेब्रुवारीमध्ये एक हजार दिवस पूर्ण करणार आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकाच दिवशी अर्थसंकल्प सादरीकरणानंतर एक भव्य अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंगळूरमधील पॅलेस ग्राउंडस्वर मेळावा आयोजित करून राज्य सरकारच्या एक हजार दिवसांच्या कामगिरीचा आनंद साजरा करण्याची तयारी सुरू आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांना या परिषदेसाठी आमंत्रित करण्याचा येणार आहे.
या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीदरम्यान राज्याच्या हमी योजनांची घोषणा केली होती. यासंदर्भात या दोघांनाही १ हजार दिवसांच्या परिषदेसाठी आमंत्रित करण्याचा आणि राज्यातील जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आभार प्रदर्शन परिषद आयोजित करण्याची योजना आखली होती. मात्र वेळेच्या कमतरतेमुळे आणि इतर अनेक समस्यांमुळे ते करू शकले नाहीत. १ हजार दिवस पूर्ण झाल्यापासून गेलेल्या वेळेचा वापर त्यांनी भव्य परिषद आयोजित करण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूल मंत्री कृष्णा व्यायरेगौडा आणि गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान हे या परिषदेचे नेतृत्व करत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कॉंग्रेस संघटन सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी परिषदेच्या रूपरेषेवर चर्चा केली आहे. मंगळवारी (दि. ३०) रात्री केरळमध्ये पोहोचलेल्या वेणुगोपाल यांनी तिरुअनंतपुरममध्ये या मुद्यावर सल्लामसलत केली. फेब्रुवारीमध्ये हजार दिवसांचा उत्सव आयोजित करून आगामी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांसाठी पक्षाच्या मोहिमेला जोरदार सुरुवात करण्याच्या कल्पनेवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची रणनिती
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यासाठी वेगळी रणनीती आखली जात असताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नवीन भूमिकेमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे आधीच जाहीर केल्यानंतर ते आता १ हजार दिवसांच्या उत्सवाद्वारे आपली जागा आणखी मजबूत करण्यासाठी सज्ज आहेत.