बेळगाव : कारवारमधील कैगा अणुऊर्जा केंद्रातून (केएनपीएस) राज्याला 50 टक्के वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे, राज्यातील वीजपुरवठ्यात चांगलीच वाढ होणार आहे. कैगा अणुऊर्जा केंद्राच्या युनिट 5 आणि 6 मधून ही वीज राज्याला मिळणार आहे.
कैगा येथील स्थानिक आणि प्रकल्पधारकांनी युनिट 5 आणि 6 विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. आंदोलनाचा इशाराही दिला होता. पण, वीज वाटपाचा निर्णय केंद्रीय ऊर्जा मंत्रालय घेणार असून राज्याचा सिंहाचा वाटा असेल. जवळजवळ 50 टक्के वीज राज्याला दिली जाईल, असे कैगा येथे असलेलेेे एनपीसीआयएलचे प्रमुख कॉर्पोरेट आयुक्त उमेद यादव यांनी सांगितले. कर्नाटकला सध्या कैगाच्या चार युनिटस्मधून 35 टक्के वीज मिळते. या युनिटमधून 220 मेगावॅट वीजनिर्मिती होते. 2030 पर्यंत 700 मेगावॅटचे दोन नवीन युनिटस् सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्याद्वारे शेजारच्या राज्यांसह दक्षिण ग्रीडला वीज पुरवठा करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्प संचालक विनोदकुमार बी. म्हणाले, वीज प्रकल्पाबाबत लोकांमध्ये कोणतीही भीती बाळगू नये. कारण सर्व सुरक्षा आणि सुरक्षितता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाकडून सर्व मंजुरी मिळाली आहे. बांधकाम वेगाने सुरू झाले आहे. उत्खननाचे काम पूर्ण झाले आहे आणि या पावसाळ्यानंतर बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे सांगितले. टर्बाईन पॅकेज मेसर्स भरत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडला देण्यात आले आहे आणि न्यूक्लियर पॅकेज मेसर्स मेघा इंजिनिअर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कैगा 5 आणि 6 युनिट विरोधी संघर्ष समिती ही कारवारमधील संस्था आहे. जी प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीला आव्हान देत आहे. या प्रकरणाबद्दल मुख्य अभियंता एच. एन. रमेह यांनी आपल्याला सर्व मंजुरी मिळाली आहे. शिवाय, कादरा धरणात युनिटस्मधून कोणताही विसर्ग होणार नाही. एकूण 10 रिअॅक्टर्सपैकी फ्लीट मोड रिअॅक्टर्स मिळवणारे कर्नाटक पहिले असेल. या प्लांटला एमओईएफ, राज्य प्रदूषण मंडळ, वन्यजीव मंडळ आणि अणुऊर्जा संशोधन मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे, असे सांगितलेे.
प्रकल्पासाठी कोणतेही भूसंपादन किंवा वनजमीन वळवण्यात येणार नाही. 1988 मध्ये 120 हेक्टरपेक्षा जास्त जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्यापैकी 65.91 हेक्टर चार युनिटस्साठी वापरण्यात आली होती आणि आता आमच्याकडे 54.09 हेक्टर जमीन आहे. आम्ही कोणत्याही नवीन अधिग्रहणाशिवाय प्रकल्प पुढे नेत आहोत, असे सांगितले.एच. एन. रमेह, मुख्य अभियंता, कैगा अणुऊर्जा प्रकल्प