Crime Pudhari
बेळगाव

Journalist Murder: पत्रकाराची हत्या, अपघात भासविला पण शेवटी बिंग फुटलंच; रेशनच्या तांदळाची काळ्या बाजारात विक्रीचं कनेक्शन

Jamkhandi Accident: संशयितांनी भासविला अपघात; जमखंडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Chikodi Journalist Murder Case

चिकोडी : पत्रकाराचा खून करून भीषण अपघात भासविल्याची धक्कादायक घटना बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे उघडकीस आली आहे. रेशनचे तांदूळ बेकायदेशीर विक्री प्रकरणातून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. बसवराज कानकोंड असे त्या पत्रकाराचे नाव आहे.

पाच दिवसांपूर्वी जमखंडी तालुक्यातील मदरखंडी क्रॉसजवळ बसवराज कानकोंड यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते घटनास्थळीच ठार झाले होते. प्रारंभी पोलिसांनीदेखील सदर मृत्यू अपघातामुळे झाल्याचे नोंद केले होते. याप्रकरणी त्यापत्रकाराच्या पत्नीने आपल्या पतीचा मृत्यू संशयास्पद असून सखोल चौकशी करण्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.

याप्रकरणी जमखंडी ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली असता दुचाकीला धडकलेले वाहन अश्पाक सुलेमान मुल्ला याचे असल्याचे समोर आले. पोलिसांनी अश्पाक याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच खून केल्याचे त्यांनी कबूल केलेे.

तपासादरम्यान पोलिसांना काळ्या बाजारातील तांदूळ विक्री प्रकरणातून हा खून झाल्याचे समोर आले. अश्पाक मुल्ला रेशनचे तांदूळ बेकायदेशीररीत्या जमा करून विक्री करत होता. पत्रकार बसवराज यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती होती. त्यांनी ही तस्करी उघड करण्याची धमकी देत काही रक्कम घेतल्याचे समजते. गेल्या चार वर्षांपासून ते पैशासाठी त्रास देत होते, असे संशयितांनी सांगितले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी केल्याने मित्रांच्या मदतीने अपघात भासवून बसवराज यांचा खून केल्याचे अश्पाक याने कबूल केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अश्पाक मुल्ला, नंदेश्वर पवाडी आणि महेश पवाडी यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जमखंडी पोलिस ठाण्यात सुरू आहे.

असा रचला खुनाचा कट

संशयितांनी पत्रकार बसवराज यांना तेरदाळच्या एका छोट्या हॉटेलमध्ये चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले. ओळखीचे राघवेंद्र तेली यांच्या मध्यस्थीने बैठक घेऊन अश्पाक तिथून निघून गेला. बाकीचे जेवणासाठी त्या ठिकाणी बसले होते. जेवण संपवून बसवराज दुचाकीवरून जमखंडीकडे जात होते. यावेळी अश्पाकचे साथीदार नंदेश्वर व महेश यांनी बसवराज यांचा पाठलाग करत होते तर अश्पाक बंडीगणी क्रॉसनजीक पिकअप वाहनात बसून वाट पाहत होता. त्याचे साथीदार सातत्याने बसवराज यांची माहिती देत होते. बसवराज जवळ आले असता त्यांच्या दुचाकीला चुकीच्या बाजूने वेगाने येऊन त्याने धडक दिली. त्यानंतर वाहन लपविले. सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावा, साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक पुरावे व चुकीची कबुली यावरून प्रारंभी अपघात म्हणून दाखल झालेले प्रकरण आता पोलिसांनी खून म्हणून नोंद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांसह वाहन ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT