रामनगर : जोयडा आणि खानापूर तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये अल्पवयीन मुलींना विविध आमिषे दाखवून परराज्यात कामासाठी पाठवण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात काही मंडळी सक्रिय असून स्थानिकांना एजंट म्हणून वापरले जात आहे. हे एजंट मुलींच्या पालकांना मोठ्या पगाराचे आश्वासन देऊन मुलींना बाहेरच्या राज्यात पाठवत आहेत. प्रत्येक मुलीवर 12 हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळत असल्याची चर्चा आहे.
मागील काही आठवड्यांत लोंढा पोलीस स्थानक व रामनगर पोलीस स्थानक हद्दीतील अनेक गावांमधून अल्पवयीन मुली परराज्यात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येथील बहुतेक मुलींना गोव्यात कामाला नेले जाते, त्यानंतर तसेच इतर राज्यातील मोठमोठ्या शहरामध्ये अधिक कमाईच्या आमिषाखाली विविध कामांसाठी पुरवले जात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे हे फक्त रोजगाराचे प्रलोभन नसून मोठ्या प्रमाणातील मानवी तस्करीचे जाळे असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
सीमावर्ती काही गावांतील अल्पवयीन मुली अर्धवट शाळा सोडून अचानक शाळेत येणे बंद झाल्याने शिक्षकांनी त्यांच्या गावात जाऊन चौकशी केली. तेव्हा त्या मुली पालकांनी कामासाठी बाहेरच्या राज्यात पाठवल्याचे स्पष्ट झाले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रामनगर आणि लोंढा पोलीस, पंचायत अधिकारी, तसेच शाळा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. दीर्घकाळापासून शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी घेऊन पोलीस आणि पंचायत अधिकारी मुलींच्या घरी भेट देत आहेत. रामनगर पोलिसांनी लोंढा पोलीस ठाण्यालाही काही मुलींची माहिती दिली असून, दोन्ही ठिकाणी तपास सुरू आहे.
एजंटांचे जाळे सक्रिय
पूर्वी गोव्यात घरकामासाठी गेलेल्या काही महिलांचा आणि स्थानिक पालकांचा एजंट म्हणून गैरवापर केल्याचे समोर आले आहे. मुलगी शिकून काय पैसे देणार,असे सांगत मुलींना बाहेर पाठवण्यास पालकांना प्रवृत्त केले जात आहे. पैशाच्या आमिषाला बळी पडून पालक स्वतःच मुलींना एजंटकडे सोपवत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
एजंटांची साखळी उध्वस्त करणे आवश्यक
सीमाभागात अल्पवयीन मुलींचे अमिष देऊन परराज्यात पाठवण्यामागे दलालांची मोठी साखळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या साखळीचा पूर्णपणे शोध घेऊन ती उध्वस्त केल्याशिवाय मुलींच्या तस्करीला आळा बसणार नाही, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.