विजापूर / जत : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण (जि. विजापूर) येथील शाखेत मंगळवारी सायंकाळी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील काही रक्कम व सोने कर्नाटक पोलिसांच्या हाती लागले आहे. दरोडेखोरांच्या मोटारीतून जप्त केलेली रक्कम व सोन्याची किंमत किती, हे स्पष्ट झाले नाही. महाराष्ट्र-कर्नाटक पोलिस या दरोड्याची सीमाभागातील गावांमधून कसून चौकशी करत आहेत. लवकरच छडा लावला जाईल, अशी ग्वाही पोलिस सूत्रांनी दिली.
दरम्यान संशयितांना ताब्यात घेण्यासाठी सात विशेष पोलिस पथकांची नेमणूक विजापूर पोलिसांनी केली असून सीमाभागातील गावांमध्ये पोलिस कसून चौकशी करत आहेत.
बँक लुटल्यानंतर दरोडेखोरांनी एका मोटारीतून चडचण येथून हुलजंती गावाकडे पलायन केले. त्यांच्या मोटारीने रस्त्यावरील काही दुचाकींनाही धडक दिली. हुलजंती येथे त्यांनी रस्ता बदलण्याचा प्रयत्न केला; मात्र गावभागातील रस्ता बंद असल्याने त्यांना मोटार थांबवावी लागली. दरोडेखोरांनी काही सोने आणि रोकड घेऊन पायीच पळ काढला. ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून मंगळवेढ्याच्या दिशेने पलायन केले. दरम्यान, काही नागरिकांनी पोलिसांना तत्काळ याची माहिती दिली.
मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास विजयपूर येथील पोलिस अधीक्षक, चडचण पोलिस ठाण्याचे निरीक्षक, मंगळवेढा पोलिस ठाण्याचे दत्तात्रय बोरीगिड्डे, उपनिरीक्षक विजय पिसे, यांच्यासह मोठा फौजफाटा हुलजंती येथे दाखल झाला. पोलिसांनी संशयस्पद मोटारीचा पंचनामा केला. मोटारीत काही सोने, रोख रक्कम, डीव्हीआर मिळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला.
दरोडेखोरांच्या शोधासाठी कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त पथके तैनात केली आहेत. दरोडा कर्नाटकातील चडचण येथे पडला असला तरी दरोडेखोर हुलजंतीपर्यंत आल्याने तपास सीमावर्ती भागात केंद्रित केला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. घटनास्थळी श्वानपथक, फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ज्ञ आले होते. बुधवारी दिवसभर हुलजंती येथे महाराष्ट्र व कर्नाटक पोलिस ठाण मांडून होते. दरोडेखोरांना पकडण्यासाठी चारही दिशांनी काम सुरु आहे. दरोडेखोरांबद्दल ठोस माहिती मिळाल्याने त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल असा विश्वास उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड यांनी व्यक्त केला आहे.
दरोडेखोरांनी हुलजंती येथे सोडलेल्या मोटारीत सोने, रोख रक्कम, डीव्हीआर, लॉक तोडण्याची साधने, चष्मा, टोपी, बुरखा असे साहित्य मिळाले. ते पोलिसांनी जप्त केले. या मुद्देमालाच्या आधारे तपास पुढे नेण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण, गुन्हे प्रकटीकरण शाखा तसेच दोन्ही राज्यांतील पोलिस पथके तपासात सक्रिय आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बँकेत असलेली रोख रक्कम आणि दागिन्यांचे मोजमाप सुरूच आहे. त्यामुळे या दरोड्यात नेमके किती किलो सोने व रक्कम लुटण्यात आली आहे, याबाबत निश्चित माहिती समजलेली नाही. मोजणी पूर्ण झाल्यानंतर याबाबत माहिती देण्याचे बँकेतून सांगण्यात आले.