

बेळगाव : गोव्यातून बेळगावात आणला जाणारा 5 लाख 63 हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठ्यासह कार व दुचाकीसह एकूण 9 लाखांचा मुद्देमाल अबकारी खात्याने जप्त केला. राकसकोपजवळ (ता. बेळगाव) शनिवारी (दि. 6) ही कारवाई करण्यात आली. मात्र, मद्य तस्कर पोलिसांवर हल्ला करुन पळून गेला असून त्याचा शोध सुरु आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गणेश विसर्जनामुळे शनिवारी बेळगाव जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी होती. अशात गोव्यातून एका कारमधून बेळगावात अवैधरित्या मद्यसाठा येत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली होती. त्यानुसार अबकारी खात्याने राकसकोपजवळ सापळा रचला होता. संबंधित कार येताच अबकारी अधिकार्यांनी ती अडविली. त्यावळी कारचालक बाळू सातेरीने अधिकार्यांवर हल्ला करुन पळ काढण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर कारची तपासणी केली असता त्यात 10 विविध ब्रँडचे एकूण 50 बॉक्स आढळले.
कर्नाटकातील मद्याच्या दरानुसार त्याची किंमत 5 लाख 63 हजार रुपये आहे. याशिवाय तीन लाख रुपये किमतीची कार आणि 30 हजार किमतीची दुचाकी असा एकूण 8 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अबकारी खाते फरार चालकाचा शोध घेत आहे.