बेळगाव/हुबळी ः जात काही केल्या जात नाही, ही मानसिकता आजही समाजात अस्तित्वात असल्याचे दाखवणारी थरारक घटना हुबळीजवळील एका खेड्यात घडली आहे. आंतरजातीय मुलाशी विवाह केला म्हणून बापासह तिच्या घरच्यांनी स्वतःच्या गर्भवती मुलीच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. यामध्ये सहा महिन्यांच्या गर्भाचाही अंत झाला आहे. कुटुंबाने मुलगीचा पती आणि सासरच्या लोकांवरही शेतवडीत हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.
हुबळी तालुक्यातील इनाम विरापूर येथे ही अंगावर शहारे आणणारी घटना रविवारी सायंकाळी घडली. मान्या विवेकानंद दोड्डमणी (वय 19) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या हल्ल्यात तिचा पती विवेकानंद (वय 22) व सासू रेणव्वा व सासरा देखील गंभीर जखमी आहेत. हुबळी ग्रामीण पोलिसांनी मान्याचे वडील प्रकाशगौडा पाटील तसेच वीरनगौडा पाटील व अरुणगौडा पाटील यांच्यासह अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त एन. शशिकुमार व जिल्हा पोलिस प्रमुख गुंजन आर्य यांनी माध्यमांना सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी मे 2025 मध्ये मान्या पाटील या 19 वर्षीय तरुणीने याच गावातील विवेकानंद दोड्डमणी नामक तरुणाशी प्रेमविवाह केला. तेव्हा तरुणीच्या कुटुंबीयांनी तीव्र आक्षेप घेतला. गावात तणाव निर्माण झाल्यानंतर तहसीलदार व पोलिसांनी या दोन्ही कुटुंबीयांना बोलावून दोघेही सज्ञान असल्याने त्यांच्या लग्नात कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही, असे समजावून सांगितले. शिवाय त्यांच्या जीवाला धोका झाल्यास तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा देत प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल केला होता.
हावेरीला गेले अन् परत आले
पोलिस प्रशासन व तालुका प्रशासनाच्या समोर प्रकरण मिटले असले तरी या नवदाम्पत्याच्या मनात आपल्या जीवाला काही तरी धोका करतील, अशी भीती घर करून होती. त्यामुळे लग्नानंतर हे दाम्पत्य हावेरीला राहायला गेले होते. गावातील वातावरण शांत झाले असेल असे समजून मान्या व विवेकानंद हे दोघेजण 8 डिसेंबर रोजी पुन्हा गावी इनाम विरापूरला आले होते. मान्या ही पतीसोबतच राहात होती.
अंतर्गत राग धुमसता
प्रशासनाने मान्याच्या घरच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तरीही त्यांच्या मनात उच्च-नीच जातीचा राग धुमसतच होता. विवेकानंद व त्याचे वडील रविवारी, 21 रोजी शेतात काम करत होते. यावेळी मान्याच्या घरातील लोकांनी दोघांना शेतात गाठत दोघांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करत जखमी केले. विवेकानंदच्या वडिलांनी पलायन केल्याने ते बचावले. मात्र, मान्याच्या वडिलांनी मुलासह दोडमणींच्या घरी जाऊन तेथे असलेल्या मान्यावर व तिची सासू रेणव्वा हिच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला केला. मान्या हिच्या पोटावर व डोकीत वर्मी घाव बसले. तिला रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांपैकी मान्याचा पती, सासूची प्रकृतीही गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सामाजिक वास्तवाचे भयंकर रूप
आंतरजातीय प्रेमसंबंधामधील सामाजिक विषमता, जातभेद आणि यातून समोर येणारे भीषण वास्तव, यावर आधारित मराठीमध्ये सैराट हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाचा शेवट धक्का देणारा दुःखांत आहे. अगदी तसाच प्रकार हुबळीजवळ घडला असून, आजही जातीमध्ये अडकलेल्या सामाजिक वास्तवाचे हे भयंकर रूप असल्याचे दिसून येते.
दोन जीव घेतले
आठ महिन्यांपूर्वी विवाह झालेली मान्यता ही सहा महिन्यांची गर्भवती होती. तिच्याच वडिलांसह नातेवाईकांनी तिच्या पोटावर धारदार वार केले. मान्याला दवाखान्यात नेताना तिचा मृत्यू झाला. रागाच्या भरात मुलीच्या घरच्यांनी दोन जीव घेतले.