खानापूर : घराच्या बाहेर लावलेल्या होंडा व सुझुकी अशा दोन दुचाकी अज्ञातांनी जाळल्याची घटना मंगळवारी (दि. 16) रात्री 12.30 च्या सुमारास हंदूरमध्ये (ता. खानापूर) घडली. यामुळे हंदूर परिसरात घबराट पसरली आहे. सद्दाम अस्लम सय्यद यांनी आपल्या दोन दुचाकी घरासमोर लावल्या होत्या.
त्या अज्ञातांनी पेटवून दिल्या. केवळ सुदैवाने घराने पेट न घेतल्याने मोठा अनर्थ टळला. तथापि या घटनेत सय्यद यांचे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी हंदूर येथे जाऊन पाहणी केली.
तसेच या घटनेची माहिती नंदगड पोलिसांना दिली. संबंधित समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी बसेट्टी सावकार, देमाण्णा बसरीकट्टी, दीपक कवठणकर तसेच हंदूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. नंदगड पोलिसात घटनेची नोंद झाली असून अज्ञात समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे.c