बंगळूर : सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गणेशोत्सव आणि ईद मिलाद उत्सव होईपर्यंत 27 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत ‘डीजे’वर बंदी घालण्याचा आदेश राज्य सरकारने संबंधित जिल्ह्यांना दिला आहे.
राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर ईद-ए-मिलाद सर्वत्र साजरी होते. यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव 11 दिवस चालतो. यानिमित्त मूर्ती प्रतिष्ठापना व वेगवेगळ्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.
या मिरवणुकीत डीजे व साऊंड सिस्टीमचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यंदा 5 ते 10 सप्टेंबर या काळीत मुस्लिम बांधवांचा ईद-ए- मिलाद सण साजरा होत आहे. या उत्सव काळात डीजे सिस्टीमचा वापर केल्याने सामान्य जनतेला, विद्यार्थी, वृद्ध, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्णांना याचा त्रास होतो. यासाठी डीजे सिस्टीमवर बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश सरकारने बजावला आहे.