

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सुपरस्टार शाहरुख खानने ‘जवान’मधील दमदार भूमिकेसाठी त्याच्या कारकिर्दीतील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला; तर दुसरीकडे ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा झाली.
चित्रपट निर्माते आणि परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा केली. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या मोठ्या चित्रपटांसोबतच आशयघन कलाकृतींचाही सन्मान झाल्याचे दिसून आले.
‘जवान’ चित्रपटातील भूमिकेसाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्याला ‘12वी फेल’ या गाजलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी विक्रांत मेस्सीसोबत विभागून देण्यात आला आहे. दोन्ही अभिनेत्यांच्या अभिनयाचे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते.
विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘12वी फेल’ या प्रेरणादायी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला. तर ‘द केरला स्टोरी’ या वादग्रस्त पण प्रचंड यशस्वी ठरलेल्या चित्रपटासाठी सुदिप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने संपूर्ण मनोरंजन करणार्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. तर राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणार्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ला देण्यात आला.