बेळगाव : मुलगाच हवा, ही मानसिकता आजही बदलली नसल्याचे आजही दिसून येते. चौथीही मुलगीच झाल्याने मातेनेच दोन दिवसांच्या बाळाचा गळा दाबून खून केल्याची हृदयद्रावक घटना रामदुर्ग तालुक्यात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकारांना दिली.
अश्विनी हणमंत हळकट्टी (वय 30, सासर मेलगरी, ता. बदामी, जि. बागलकोट, माहेर हिरेमंगलगी, ता. रामदूर्ग) ही महिला चौथ्यांदा गर्भवती होती. यासाठी ती काही दिवसांपूर्वी हिरेमंगलगी येथे माहेरी आली होती. दिवस पूर्ण झाल्याने ती बाळंतपणासाठी मुदकवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. तिने याच दिवशी एका गोंडस बाळाला नैसर्गिकरित्या जन्म दिला.
स्वतःच गळा दाबल्यानंतरही आपले बाळ निपचित पडले आहे, असे सांगत तिने रडायला सुरवात केली. बाळाच्या आजीने नातीला तातडीने रामदूर्ग येथील सरकारी रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता गळा दाबल्याने श्वास कोंडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पुढील सर्व प्रकार उघडकीस आला.
या महिलेला पहिल्या तीन मुली आहेत. चौथ्यांदा मुलगा होईल, अशी तिची अपेक्षा होती. परंतु, मुलगीच झाल्याने ती नाराज होती. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहून 23 नोव्हेंबर रोजी ती माहेरी गेली; पण तिच्या मनात काही वेगळेच शिजत होते. बाळाला बाजूला पाहून तिला आनंद होण्याऐवजी ती मुलगी असल्याचे शल्य तिला सतत बोचत होते. घरी कोणीच नसल्याचे पाहून तिने या दोन दिवसांच्या चिमुकल्याच्या गळ्यावर जोराने अंगठा दाबला. यामध्ये या मुलीचा श्वास कोंडून मृत्यू झाला.