बंगळूर : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून बिदर जिल्ह्यातील औरादच्या माजी आमदाराला डिजीटल पद्धतीने ब्लॅकमेल करण्यात आले आहे. काळा पैसा पांढरा केल्याच्या गुन्ह्यात अटक करतो, अशी बतावणी करून त्याला तब्बल 31 लाख रुपयांना गंडवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या माजी आमदाराला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नकली न्यायालयासमोरही हजर करण्यात आले होते. माजी आमदाराने पोलिसांत तक्रार केली आहे. मात्र पोलिसांनी त्याचे नाव जाहीर केलेले नाही.
गेल्या 12 ऑगस्टरोजी संध्याकाळी 6 वा. माजी आमदाराला एका व्यक्तीने फोन करून सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर हल्ला झाला, तेंव्हा तुमच्या नावाची बँक खाती व डेबिट कार्ड सापडले असून तुमच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल केला असल्याचे म्हटले.
फसवणूक करणार्यांनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचा दावा केले. तसेच त्यांच्या संपत्तीविषयीची माहिती त्यांना दिली. त्यानंतर फसवणूक करणार्याने तो कॉल दुसर्या वरिष्ठ अधिकार्याकडे हस्तांतरित करत असल्याचे सांगितले. नंतर नीरज कुमार नावाच्या एका व्यक्तीने स्वतःची ओळख डीसीपी अशी करून दिली. त्यानेही अटकेची भीती घातली. तसेच तुमचे वय व पार्श्वभूमी पाहता आम्ही तुमची व्हर्च्युअल चौकशी करून डिजिटल कोठडीत ठेवू, असे म्हटले. तसेच त्यांच्यावर व्हॉट्सअॅप कॉलद्वारे पाळतही ठेवण्यात आली.
भामट्यांनी आपले ओळखपत्र, अटक वॉरंट व गुन्ह्याची प्रत दाखवली. तसेच माजी आमदाराला नकली पोलिस स्टेशनही दाखविले. मात्र ते खरे असल्याचे भासवले.
दुसर्या दिवशी दुपारी 1 वा. भामट्यांनी माजी आमदाराला व्हिडिओ कॉलद्वारे नकली न्यायाधीशांसमोर हजर केले. पोलिसांचा युक्तिवाद व माजी आमदाराचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांनी, तुम्ही फसवणूक केली नाही, असे लिहून देण्याचा आदेश देत पोलिस अधिकार्यांनी सांगितलेल्या खात्यावर आरटीजीएसद्वारे 10.99 लाख देण्याचे आदेश दिला. त्यानुसार माजी आमदाराने पैसे दिले.पुन्हा 14 ऑगस्टपासून नीरज कुमार व सहकार्यांनी माजी आमदाराकडून त्याच्या कुटुंबातील सदस्य, त्यांची बँक खाती व इतर वैयक्तिक माहिती मिळवली. चार दिवसांनंतर परत माजी आमदाराला पुन्हा न्यायाधीशांसमोर व्हिडिओ कॉलद्वारे हजर करून पुन्हा 20 लाख जमा करण्यास सांगितले. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माजी आमदाराने कुटुंबातील सदस्यांसह मित्रांना माहिती देऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक व तोतयागिरीचा गुन्हा दाखल केला असून सायबर गुन्हे पोलिस तपास करत आहेत.