बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी गावातील साखर कारखान्यात झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मुरकुंबी गावातील इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन मृत झालेल्या कामगारांची संख्या 7 वर पोहोचली आहे. बुधवारी (दि. 7) झालेल्या या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. उपचार घेत असलेल्या चौघांचा गुरुवारी (दि. 8) मृत्यू झाला.
या कारखान्यात भिंत दुरुस्त करताना बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. बॉयलरमधील गरम पदार्थ कामगारांवर पडल्याने आठ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर कामगारांच्या कुटुंबांचा संताप अनावर झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे एका गर्भवती महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून, त्या महिलेला अद्याप या घटनेची माहिती देण्यात आलेली नाही.
दीपक मुनवळ्ळी (वय 31, नेसरगी, ता. बैलहोंगल), सुदर्शन बनोशी (वय 25, रा. चिकमुनवळ्ळी, ता. खानापूर), अक्षय चोपडे (वय 48, रा. रबकवी-बनहट्टी, जि. बागलकोट) यांचा बुधवारी मृत्यू झाला तर गुरुवारी भरत गारवाडी (वय 27, रा. गोडचिनमलकी ता. गोकाक), मंजुनाथ काजगार (वय 28, रा. अरवळ्ळी, ता. बैलहोंगल) आणि बागलकोट जिल्ह्यातील मरेगुड्डी गावातील गुरुपादप्पा तम्मनवर (वय 38) आणि मंजुनाथ तेरदाळ (वय 38) यांचा मृत्यू झाला. गोकाक तालुक्यातील गिळीहोसूर येथील राघवेंद्र मल्लाप्पा गिरियाळ (वय 36) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत कामगार मंजुनाथ तेरदाळ याचा भाऊ विश्वनाथ तेरदाळ पत्रकारांशी बोलताना म्हणालेे, या घटनेने आमच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. माझा भाऊ दोन वर्षांपासून मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करत होता. ही घटना घडल्यानंतर आम्हाला त्याची माहिती देण्यात आली नाही. माध्यमांमध्ये बातम्या पाहिल्यानंतर आम्ही रुग्णालयाकडे धाव घेतली. त्याची पत्नी गर्भवती असून काही दिवसातच तिची प्रसूती होणार आहे. त्यांना जर ही घटना समजली तर धक्का बसू शकतो. त्यामुळे आम्ही याची माहिती त्यांना दिलेली नाही. आपल्या कुटुंबाला जोपर्यंत योग्य भरपाई दिली जाणार नाही. तोपर्यंत मृतदेहाला हात लावला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेबाबत रामदुर्ग डीएसपी आणि मुरगोड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक पुढील तपास करत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तिघांविरोधात गुन्हा
प्राथमिक तपासानुसार कारखाना व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुरगोड पोलिस स्थानकात तिघांविरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम 125(2), 289 आणि 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य व्यवस्थापक व्ही. सुब्बुतीनम (बंगळूर), इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रवीणकुमार टाकी आणि सहाय्यक व्यवस्थापक एस. विनोदकुमार (चामराजनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.