Elephants wreak havoc in Kanjale and Kabnali, causing damage to crops
खानापूर : पुढारी वृत्तसेवा
हत्तींच्या कळपाने निलावडे ग्रामपंचायतच्या हद्दीतील कांजळे, कबनाळी, आंबोळी या परिसरातील शिवारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हत्तींची मजल गावापर्यंत पोहोचली असून परसातील झाडेही शिल्लक राहिलेली नाहीत. शनिवारी पहाटे कांजळे येथील शेतकरी विनायक मुतगेकर यांच्या शेतातील २०० केळीची व ५ नारळाची झाडे हत्तींनी जमीनदोस्त केली आहेत. आंबोळी येथील विष्णू पाटील यांच्या केळीच्या बागेतील झाडांचेही कळपाने मोठे नुकसान केले आहे.
दोन दिवसांपूर्वी कबनाळी येथील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उन्हाळी लागवडीच्या भात पिकाचे कळपाने अतोनात नुकसान केले होते. त्यानंतर याच परिसरात कळप ठाण मांडून आहे. कळपासोबत लहान पिल्ल असल्याने रात्री ज्या भागात कळप वास्तव्याला आहे. दिवसाही त्याच परिसरात कळपाचा वावर आहे.
आंबोळी व कांजळे या गावांच्या दरम्यान असलेल्या शेतवडीत ऊस लावणीच्या कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सकाळी नऊच्या सुमारास मुतगेकर यांच्या शिवारात पिल्लासोबत तळ ठोकून असलेला हत्ती दृष्टीस पडला. माणसाची चाहूल लागताच हत्ती आक्रमक बनला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेथून पळ काढला.
या भागातील ऊस पिक कमी झाल्याने हत्तींनी आता केळी व नारळाच्या बागांकडे आपला मोर्चा वळविला असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे.