बेळगाव ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे यांनी उपस्थित राहावे, यासाठी विनंती करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला उपस्थित उपमुख्यमंत्री शिंदे यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी समिती नेत्यांनी 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी मूळ दाव्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्याआधी उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन रणनीती आखावी, अशी विनंती केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आपण या सुनावणीला ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे यांनी उपस्थित राहावे, यासाठी विनंती करण्यात येईल. त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसेल तर व्हीडीओ कॉन्फरेन्सद्वारे सहभागी होता येते का, यासाठीही विनंती करून न्यायालयाची परवानगी घेण्यात येईल, असे सांगितले. यावेळी सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. म. ए. समितीचे प्रकाश मरगाळे, विनोद आंबेवाडीकर, मारुती मरगाण्णाचे, सतीश देसाई, बाबू कोले, सुहास हुद्दार, निरंजन सरदेसाई, उमेश पाटील, शुभम हंडे, मोतेस बारदेसकर, अजित पाटील, महादेव मंगणाकर आदी उपस्थित होते.