Eknath Shinde : महाराष्ट्रात हिंदी सक्ती होऊ देणार नाही

एकनाथ शिंदे; 100 वे साहित्य संमेलन ‌‘न भूतो न भविष्यती‌’ व्हावे
Eknath Shinde
साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना ना. एकनाथ शिंदे, व्यासपीठावर ना. उदय सामंत, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. भरत गोगावले, विश्वास पाटील, प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी व इतर. (छाया : साई फोटोज)
Published on
Updated on

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाल्यानंतर आता 100 वे मराठी साहित्य संमेलन हे ‌‘न भूतो न भविष्यति‌’ असे व्हावे यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल आणि काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, साहित्य संस्थांमध्ये कोणताही राज्यकीय हस्तक्षेप नसेल आणि हिंदी सक्ती कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. मराठी भाषेचाच मानसन्मान वाढवला जाईल, असा निर्वाळाही ना. एकनाथ शिंदे यांनी दिला.

Eknath Shinde
Eknath Shinde | तुम्ही मुंबईचे लुटारू, आम्ही रखवालदार: एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ना. भरत गोगावले, आ. महेश शिंदे, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रशासकीय अधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नंदकुमार सावंत उपस्थित होते.

ना. एकनाथ शिंदे म्हणाले, माय मराठीच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. आपली तपश्चर्या फळाला आली, अशी भावना आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठीसाठी जे जे करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी भाषा भवनाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. दिल्लीमध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने भाषा केंद्र सुरू केले आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंच सुरू केले आहेत. मराठी भाषेसमोर एआयचे आव्हान असले तरी मराठी ही केवळ संवादाची भाषा न राहता ती जागतिक व्यवहाराची भाषा व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. या वर्षी संमेलनासाठी 3 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ना. शिंदे पुढे म्हणाले, मराठ्यांचा पराक्रम अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या साताऱ्यात हे संमेलन होत आहे याचा खूप आनंद आहे. त्यामुळे संमेलनाला काहीही कमी पडू नये, अशी आमची भावना होती. ज्या मोठ्या संख्येने मराठी साहित्यप्रेमींनी उपस्थिती दाखवली त्यामुळे संमेलनाची शोभा वाढली आहे. 100 वर्षे चाललेला असा उपक्रम अन्य कोणत्याही भाषेत नाही ही मराठी जणांसाठी अभिमानाची बाब आहे.

ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, संमेलनाला गेल्या चार दिवसात आठ लाख साहित्यरसिकांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळवलेल्या स्वराज्याचा विस्तार छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या काळात अटकेपार गेला. थोरल्या शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास झाकोळला गेला आहे. आपल्या लेखणीतून छत्रपतींचा दैदिप्यमान इतिहास समाजासमोर आणणाऱ्या संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कर्तृत्वावरही प्रकाश टाकावा. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पुढील नाट्य संमेलनाचे यजमानपदही साताऱ्याला मिळावे, अशी मागणी त्यांनी उदय सामंत यांच्याकडे केली.

प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी म्हणाले, 12 वर्षांच्या प्रयत्नानंतर सातारानगरीला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. शताब्दी आधीचे संमेलन असल्याने दडपण होते. संमेलन यशस्वीरित्या पार पडले म्हणजे उपक्रमाचा शेवट झाला, असे नाही तर या निमित्ताने साताऱ्यात पुन्हा एकदा साहित्यिक, सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती झाली. त्यामुळे पुन्हा एकदा साहित्यिक चळवळ यशस्वी करुन साताऱ्याचा बुलंद आवाज महाराष्ट्रात गुंजत ठेवू. संमेलनाचे संरक्षक, ज्येष्ठ उद्योजक फरोख कूपर यांचा तसेच व्ही. पी. परांजपे ऑटो कास्टचे व्हाईस प्रेसिडेंट ऋषिराज यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Eknath Shinde
Eknath Shinde | कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत जागा वाटपात कमी-जास्त होईल, पण महायुती...: एकनाथ शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news