बेळगाव : महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्याविरोधात सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर होऊनही आणि महापौर, उपमहापौरांनी निवेदन देऊनही त्यांची बदली करण्यात आली नाही. भ्रष्ट अधिकार्यांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळत आहे, असा आरोप करत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी सोमवारी (दि. 6) आयुक्त शुभा बी. यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. आयुक्तांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.
पीआयडी, ई-आस्ती आणि शहरातील लीज संपलेल्या जागा ताब्यात घेण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि करवसुलीत घोटाळा केल्याच्या आरोपाखाली महसूल उपायुक्त तालिकोटी यांच्याविरोधात सर्वसाधारण सभेत त्यांची अन्यत्र बदली करावी व नगरविकास खात्याकडे तक्रार करावी, असा ठराव संमत करण्यात आला. पण, या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे, संतापलेल्या नगरसेवकांनी सोमवारी आयुक्तांच्या कक्षासमोरच ठिय्या मांडला.
महसूल उपायुक्तांविरोधात अनेक तक्रारी असताना आणि त्यांच्या बदलीचा ठराव मंजूर होऊनही त्या आजही पदावर कार्यरत आहेत. याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी, निवडलेल्या सदस्यांना प्रशासनात कोणतीही किंमत राहिली नाही, असा आरोप करत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक ठिय्या मांडून बसले.
यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी आंदोलकांना संबोधित केले. आम्ही लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत. त्यावेळी सामूहिक राजीनामा देण्यासंबंधीचे निवेदनही सादर केले जाईल. महापालिकेला योग्य अधिकारी द्यावेत आणि भ्रष्ट अधिकार्यांची सेवा तत्काळ समाप्त करावी, अशी मागणी कोंगाळी यांनी केली.
भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकार्यांची बदली न करता त्यांना सेवेत कायम ठेवले जात आहे. निवडलेल्या सदस्यांविरुद्ध सरकारकडून षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी नगरसेवक रवी धोत्रे, आनंद चव्हाण, श्रीशैल कांबळे, जयंत जाधव, नितीन जाधव, गिरीश धोंगडी, सारिका पाटील, रविराज सांबरेकर, अभिजीत जवळकर, राजू भातकांडे, श्रेयस नाकाडी आदी सहभागी झाले होते. आयुक्त शुभा बी. आणि प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी नगरसेवकांची भेट घेतली. पण, नगरसेवकांनी तालिकोटी यांच्या मागणीसाठी आंदोलन करतच राहणार, असा इशारा दिला.