बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कर्ज परतफेडीला कंटाळून रायबाग तालुक्यातील कुडची गावात एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना आज (दि. ११ ) सकाळी उघडकीस आली. नितीन मनोहर काशीद (वय ३५, रा. कुडची) असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन यांनी अलीकडेच नवीन घर बांधले होते. यासाठी त्यांनी बँकेकडून तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे हप्ते वेळेवर फेडता न आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वसुलीचा तगादा सुरू होता. त्यामुळे नितीन नैराश्यात होते.
आज सकाळी बराच वेळ झाल्यानंतरही नितीन खोलीबाहेर न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडण्यात आला असता नितीन यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
या प्रकरणी नितीन यांच्या पत्नी पूनम यांचा पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. या घटनेची नोंद कुडची पोलीस ठाण्यात झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.