

बंगळूर : गेल्या अनेक दिवसांपासून बंगळुरात दुसर्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत चर्चा सुरू आहे. यासाठी दोन ठिकाणी जागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. बेळगाव-हुबळीदरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची मागणी आहे. आगामी काळात याविषयी पाहणी केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.
सोमवारी (दि. 7) येथे ते पत्रकारांशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कुणिगल-नेलमंगलानजीक तसेच कनकपूरनजीक जागांची पाहणी केली जाणार आहे. या आठवड्यात केंद्रीय पथक जागेच्या पाहणीसाठी येत आहे. जागा पाहिल्यानंतर तत्काळ केंद्रीय पथकाकडून होकार दिला जात नाही. त्याविषयी चर्चा केली जाते. रोज प्रवासी मिळणार का? हवाई उड्डाण सुरळीत पार पडणार का? स्थानिकांना याचा धोका आहे का? विमानतळातून निर्माण होणारे रोजगार, महसूल अशा अनेक विषयांबाबत विचार करावा लागतो. त्यानंतर जागा निश्चित केली जात असल्याचे ते म्हणाले.
चित्रदुर्ग-शिरादरम्यान जिल्हा विमानतळाबाबत 33 आमदारांच्या सह्या संग्रहित करण्यात आल्या होत्या. टी. बी. जयचंद्र यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. याविषयी प्रतिक्रिया देताना मंत्री पाटील यांनी जयचंद्र हे काँग्रेसमधील ज्येष्ठ आमदार आहेत. सध्या बंगळुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयी चर्चा सुरु आहे. याची कल्पना त्यांना दिली आहे. चित्रदुर्ग-शिरादरम्यान जिल्हा विमानतळ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचनेविषयी श्रेष्ठींकडून निर्णय घेतला जाणार आहे. त्यांच्या इच्छेनुसार ते निर्णय घेतील. कुणाला मंत्रिपद मिळणार कुणाला डच्चू देणार याचा निर्णयही तेच घेतील. नेतृत्वबदल हा प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेला विषय आहे. पक्षामध्ये तसे काहीच घडलेले नाही. ईश्वर खंड्रे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याविषयी श्रेष्ठीच जाहीर करतील. आपल्या नावाचा उल्लेख कुणी केला माहीत नाही. आपण ते पद मागितले नाही. सध्या तर खात्यामध्ये काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपमध्ये अनेक समस्या आहेत. महागाई वाढली म्हणून जनआक्रोश यात्रा करणार्या नेत्यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचाराविषयी बोलावे. त्या पक्षात सध्या शेकडो समस्या आहेत. सरकारवर आरोप करणार्या भाजप नेत्यांनी आधी सिंहावलोकन करण्याचा सल्ला मंत्री एम. बी. पाटील यांनी दिला.