Ganeshpur woman killed by road pothole
बेळगाव : बेळगाव - वेंगुर्ला रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मोठमोठ्या व्यासाचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहे. असाच अपघात होऊन गणेशपूर येथील शिवांजली विशाल शहापूरकर (वय 38) या महिलेचा खड्ड्याने बळी घेतला. 20 जून रोजी बेळगाव येथून जात असताना कुद्रेमानी फाट्याजवळ अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. गुरुवारी (दि. 10) या महिलेचा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळच्या मांडेदुर्ग (ता. चंदगड) व सध्या गणेशपूर येथील रहिवासी शिवांजली विशाल शहापूरकर या 20 जूनरोजी आपले पती विशाल यांच्या दुचाकीवरून आपल्या दोन मुलांसह बेळगाव येथून मांडेदुर्ग येथे जात होते. यावेळी कुद्रेमानी फाटा येथे एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या शिवांजली या रस्त्यावर पडल्या. यावेळी मागून येणाऱ्या टेम्पो खाली त्या सापडल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या कंबरेवरून टेम्पोचे चाक गेले होते.
20 जूनपासून बेळगाव येथे केएलई रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा गुरुवारी (दि. 10) सकाळी मृत्यू झाला. सदर अपघाताची नोंद काकती पोलिसांत झाली असून दोडामार्ग कोनवाळ कट्टा येथील टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातावेळी दुचाकीवर शिवांजली यांची आयुष व शिवांश ही दोन मुलेही होती. मात्र या अपघातात शिवांजली या गंभीर जखमी झाल्या.
शिवांजली यांचे पती सैन्य दलात असून बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये कार्यरत आहेत. गणेशपूर येथे अनेक वर्षांपासून सदर कुटुंब वास्तव्याला आहे. शिवांजली यांच्या पश्चात पती, दोन लहान मुलगे, सासू-सासरे, दीर असा परिवार आहे.