

चंदगड : ट्रकचे वजन करताना त्यात माणसे, दगड व पाण्याचे बॅरल बसवून वजन वाढवायचे आणि नंतर काजू भरण्यापूर्वी ते काढून टाकायचे, अशा अनोख्या शक्कलने चालकांनी तब्बल 10 टन कच्चा काजू लंपास केला आहे. या प्रकारामुळे तुडीये व बेळगाव येथील काजू उद्योजकांना सुमारे 14 लाख रुपयांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. याप्रकरणी चंदगड पोलिसात तिघांसह एकूण 11 अज्ञातांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संघटित गुन्हेगारीमुळे तुडीये (ता. चंदगड) येथील उद्योजक अमितकुमार कृष्णा पाटील यांचे 4 लाख 14 हजार रुपयांचे, तर बेळगाव येथील अनंत पांडुरंग कुलकर्णी (रा. सह्याद्रीनगर, बेळगाव) यांचे 9 लाख 87 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अमितकुमार पाटील यांनी 102 टन काजू मागवला होता, त्यापैकी चालक सुनील व प्रशांत यांनी इतर साथीदारांसह संगनमत करून सुमारे 3 टन काजू चोरला व तो सूरज जयनापूर याला विकला. त्याचप्रमाणे, अनंत कुलकर्णी यांच्या 283 टन मालापैकी सात अनोळखी चालकांनी 7 टनांहून अधिक काजू लंपास केला.
एकूण दहा ट्रकमधून हा माल चोरण्यात आला. आधीच विविध कारणांमुळे अडचणीत असलेल्या काजू उद्योगाला या नव्या फसवणुकीच्या प्रकारामुळे मोठा धक्का बसला आहे. अमितकुमार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, पोलीस हवालदार सतीश कुरणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.