चिकोडी : कर्नाटकाच्या इतिहासात सर्वात मोठी सायबर फसवणूक प्रकरण बेंगळुरातील व्हाईट फील्ड येथे उघडकीस आले आहे. देशातील प्रतिष्ठित क्रिप्टो करन्सी कंपनी असलेली नेबिलो टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेडचा सर्वर हॅक करून, सायबर चोरट्यांनी 378 कोटी रुपये चोरी केले आहेत.
या प्रकरणी व्हाईटफिल्ड सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात नेबिलो टेक्नॉलॉजी कंपनीत कार्यरत असलेल्या राहुल अगरवाल या कर्मचाऱ्याला संशयाच्या आधारे अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप जप्त करून तपास सुरू केला आहे.
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी दोन वेळा कंपनीचा सर्व्हर हॅक केला. पहिली हॅकिंग पहाटे २:३० वाजता झाली असून, त्या वेळी वॉलेटमधून १ USDT ट्रान्सफर करण्यात आला होता. ही एक चाचणी स्वरूपातील हॅकिंग असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर सकाळी ९:४० वाजता पुन्हा एकदा सर्व्हर हॅक करून तब्बल ४४ मिलियन (अंदाजे ३७८ कोटी रुपये) ट्रान्सफर करून घेण्यात आले. यामागे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा हात असण्याची शक्यताही तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.
सध्या सायबर क्राईम विभागाचे अधिकारी घटनास्थळी तपास करत असून, सर्व डिजिटल पुरावे गोळा केले जात आहेत. या सायबर फसवणुकीमुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासाठी कंपनीचा सर्व्हर व संबंधित डेटा फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने तपासणीसाठी पाठवला आहे.