बेळगाव : अधिवेशन काळातील कामाबाबत पोलिसांना माहिती देताना वरिष्ठ अधिकारी. Pudhari Photo
बेळगाव

City Under Police Security | शहराला पोलिस छावणीचे स्वरुप

सर्वत्र कडेकोट बंदोबस्त : सुवर्णसौधसह महामेळाव्याच्या ठिकाणी अधिक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून (दि. 8) सुवर्णसौधमध्ये प्रारंभ होत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित केला आहे. या पृष्ठभूमीवर शहरासह सुवर्णसौध परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल सहा हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. सुवर्णसौध व महामेळाव्याच्या ठिकाणावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे रविवारी (दि. 7) सायंकाळपासूनच शहराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी बंगळूरहून मंत्री, आमदार व अधिकारी बेळगाव दाखल झाले आहेत. त्यांची बडदास्त ठेवण्यासह संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी सहा हजार पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून परजिल्ह्यातून पोलिस फौजफाटा मागविण्यात आला आहे. रविवारी पोलिस आयुक्त कार्यालय आणि जिल्हा पोलिस मुख्यालयासमोर पोलिसांच्या तुकड्या दाखल झाल्या होत्या.

पोलिस आयुक्त भूषण बोरसे व जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी त्यांना बंदोबस्ताबाबत सूचना केल्या. त्यानुसार रात्री सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी आपापल्या बंदोबस्तस्थळी दाखल झाले. अधिवेशनकाळात सुवर्णसौधपासून तीन किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. अधिवेशनामुळे शहरातून सुवर्णसौध व इतर ठिकाणी मंत्री, आमदार व अधिकारी ये - जा करणार आहेत.

त्यावेळेत रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रहदारी पोलिस व अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध चौकांमध्ये तसेच सिग्नलच्या ठिकाणी रहदारी पोलिसांना दिवसभर सेवा बजावावी लागणार आहे. यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मंत्री व अधिकारी ये-जा करण्याच्या वेळेत रहदारीची कोंडी होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

असा असेल बंदोबस्त

पोलिस आयुक्त भूषण बोरसे व सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली 146 वरिष्ठ पोलिस अधिकारी, 3,820 पोलिस कर्मचारी, 500 होमगार्ड, जलद कृती दलाच्या आठ तुकड्या, जिल्हा राखीव दलाच्या 10 तुकड्या, केएसआरपीची 35 पथके, एक बॉम्ब शोध पथक, एक गरुड पोलिस पथक, 16 तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी आणि उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष ठेवून असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT