बेळगाव : नातवासोबत वृद्धा रस्त्याच्या बाजूने फिरायला गेली असताना दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी भर दुपारी आझमनगर येथे घडली. झटापटीमध्ये वृद्धा जखमी झाली आहे.
पद्मजा मधुसूदन कुलकर्णी (वय, 75 रा. आझमनगर) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. आपल्या नातवासमवेत त्या दुपारी तीनच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या. घरापासून शंभर फुटापर्यंत गेल्यानंतर दुचाकीवरून आलेले भामटे त्यांच्याजवळ येऊन थांबले. दुचाकीवर मागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार पकडून हिसडा मारला. त्यात त्या खाली कोसळल्या. त्यांच्या नातवाने आणि त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत भामटे दुचाकीवरून पळून गेले. हिसड्यामुळे पद्मजा यांच्या गळ्याला दुखापत झाली.
घटनेनंतर काही वेळातच परिसरातील लोक जमा झाले. काही तरुणांनी भामट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते हाती लागले नाहीत. घटनेची माहिती एपीएमसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊ पद्मजा यांच्याकडून माहिती घेतली. चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. निरीक्षक मंजुनाथ बी. पुढील तपास करत आहेत.
सतत रहदारी असलेल्या रस्त्यावर भामट्यानी दिवसाढवळ्या अशाप्रकारे वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा घटना थांबल्या होत्या. मात्र आजच्या घटनेमुळे सराईत टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते.