बेळगाव : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि. 8) सुरु होणार आहे. अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. परस्पर समन्वयाने कामकाज करावे, अशा सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या.
अधिवेशनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचार्यांची बैठक शुक्रवारी (दि. 5) जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित केली होती. यावेळी सीईओ शिंदे यांनी कामाचा आढावा घेत विविध सूचना दिल्या. ते म्हणाले, यापूर्वी बेळगावात आयोजित केलेली अधिवेशने सुरळीत पार पडली आहेत. त्याचप्रमाणे हे अधिवेशनही कोणत्याही त्रुटींशिवाय पार पाडण्यात यावे. सोपविलेले काम प्रत्येकाने प्रामाणिकपणे करावे.
सुवर्णसौधमध्ये अधिकार्यांना देण्यात आलेल्या कक्षात कोणत्याही साहित्याची कमतरता भासू नये यासाठी खबरदारी घ्यावी. संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या अधिकार्यांनी संबंधित विभाग आणि मंत्रालयातील अधिकार्यांच्या दौर्याच्या कार्यक्रम नियोजनाची माहिती त्यांच्या स्वीय साहाय्यकांकडून घ्यावी. हॉटेलमध्ये राहण्यासाठी दिलेल्या खोल्यांची आगावू पाहणी करावी. लोकप्रतिनिधींची योग्य व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.
संपर्क अधिकार्यांनी इंटरनेट कनेक्शनसाठी स्वतःचे डोंगल बनवावेत. वरिष्ठांनी मागितल्यावर ते त्यांना द्यावेत. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या संबंधित खोल्यांमधील संगणक आणि प्रिंटर योग्यरित्या कार्यरत आहेत याची खात्री करावी. देखभालीमध्ये त्रुटी आढळल्यास तांत्रिक साहाय्यकाशी संपर्क साधावा. विभाग आणि मंत्रालयातील अधिकार्यांसाठी योग्य वाहन व्यवस्था करावी, अशी सूचना शिंदे यांनी केली.
बैठकीला जि. पं. चे उपसचिव (प्रशासन) बसवराज हेग्गनायक, उपसचिव (विकास) बसवराज अडविमठ, मुख्य लेखापाल परशुराम दुडगुंटी, प्रकल्प संचालक रवी बंगारेप्पन्नावर, मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवटेर, साहाय्यक सचिव राहुल कांबळे, कार्यालय व्यवस्थापक बसवराज मुरघामठ आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अधिकार्यांना सूचना
आलेल्या सर्व विभागांच्या वरिष्ठांना जिल्ह्यातील ग्राम पंचायतींना भेट द्यायची असेल तर त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था करावी. सर्व अधिकार्यांनी वरिष्ठांच्या फोन कॉलला प्रतिसाद द्यावा. काही समस्या असल्यास थेट जिल्हा पंचायत उपसचिव आणि योजनाधिकार्यांशी संपर्क साधावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी अधिकार्यांना केल्या.