

बंगळूर : विधान परिषदेच्या चार सरकारनियुक्त सदस्यांच्या यादीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा वादविवाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनेक पक्षनेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर विधान परिषद सदस्यांची यादी तयार केली होती. मात्र, हायकमांडने या यादीला स्थगिती दिली असून, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मंगळवार, दि. 10 रोजी दिल्लीला रवाना होणार आहेत.
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी रमेश बाबू, डॉ. आरती कृष्णा, दलित कार्यकर्ते डी. जी. सागर आणि पत्रकार दिनेश अमीन मट्टू यांची नावे अंतिम केली होती. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या यादीला हायकमांडने हिरवा कंदील दिला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविली होती. मात्र, हायकमांडने स्थगिती आदेश दिला आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यादीतील काही नावांवर आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर हायकमांडला त्यांच्याशी पुन्हा चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या ही यादी राजभवनला मंजुरीसाठी पाठवू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. दिल्लीत असलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे हायकमांड स्तरावरील लॉबीमुळे यादी थांबवण्यात आल्याचे सांगत आहेत.
महत्त्वांच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्ली दौर्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत. यात विधान परिषदेच्या चार नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती, स्थगित असलेल्या कॉर्पोरेशन बोर्डांच्या नियुक्यांचा समावेश आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बदल, जिल्हा, तालुका पंचायत निवडणुका आणि मागासवर्गीय स्थायी आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीबाबतही हायकमांडशी सल्लामसलत करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यात खळबळ माजवणार्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री अहवाल सादर करणार आहेत. आयपीएल स्पर्धा जिंकल्याबद्दल आरसीबी संघाचे अभिनंदन करण्यासाठी राज्य सरकारवर येणारा दबाव, सरकारच्या निर्णयानंतर झालेली चेंगराचेंगरी आणि त्यानंतर झालेल्या पोलिस अधिकार्यांच्या निलंबनाबाबत सिद्धरामय्या हायकमांडशी चर्चा करतील.
केंद्रातील सत्ताधारी एनडीएने पुढील आठवड्यात सुरू होणार्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बंगळुरातील चेंगराचेंगरीला प्रमुख मुद्दा बनवले आहे. या अधिवेशनात काँग्रेस पक्ष आणि कर्नाटक सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी एनडीए करत आहे. सरकारच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाने तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर हायकमांड मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण घडामोडींची माहिती जमा करणार आहेत. संसदेत सरकारला तोंड देण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.