बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
पावसामुळे नुकसान झालेल्या घरांच्या नुकसानभरपाईच्या वितरणात विलंब होणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय जीवितहानीसंदर्भात त्वरित भरपाई वितरणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना जिल्हा पालक सचिव विपुल बन्सल यांनी केली. शनिवारी (दि.19) जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित विविध विभागांच्या जिल्हास्तरीय विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई वितरणाशी संबंधित विभागांनी संयुक्त सर्वेक्षणाचे काम त्वरित पूर्ण करून नुकसान भरपाई वाटपाची कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले. प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ग्रामसभा अनिवार्यपणे आयोजित कराव्यात. ग्रामसभांच्या मागणीनुसार तयार केलेले कृती आराखडे या आर्थिक वर्षात पूर्ण झाले असून अनुदान वाया गेले नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पंचायत अंतर्गत विविध गृहनिर्माण योजनांतर्गत निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करावे. ग्राम पंचायतीच्या हद्दीत जमा होणार्या घनकचर्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करावे. प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये घनकचरा विल्हेवाट लावणारे युनिट स्थापन करावे. ग्रामपंचायतींनी गावांमध्ये स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करावी. जलजीवन मिशन योजनेतील प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करावीत. आधीच ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासोबतच पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या. तसेच हिवाळी अधिवेशन आणि कित्तूर राणी चन्नम्मा उत्सवाची माहिती त्यांनी घेतली.
यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेश कुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कृषी खात्याचे सहसंचालक शिवानगौडा पाटील, समाजकल्याण खात्याचे सहसंचालक रामणगौडा कन्नोळी, नगरविकास नियोजन कक्षाचे नियोजन संचालक मल्लिकार्जुन कलादगी आदी उपस्थित होते.